थकबाकी वसुलीसाठी महापालिकेचा कृती आराखडा

0

मार्चमध्ये थकबाकी वसूलीसाठी मोहीम

पुणे : महापालिकेचे आर्थिक उत्पन्नाचे साधनं मर्यादित आहेत. मात्र, त्याच वेळी खर्चाचे प्रमाण अधिक आहे. ही बाब लक्षात घेऊन मार्चमध्येच शहरात थकबाकी वसुलीसाठी महापालिकेकडून  विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे. त्यासाठी ज्या विभागांची थकबाकी अधिक आहे, अशा विभाग प्रमुखांची बैठक अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी मंगळवारी बैठक बोलाविली  असून या वसुलीसाठी महिनाभराचा कृती आराखडा निश्चित केला जाणार आहे. पालिकेच्या वेगवेगळ्या विभागांची सुमारे 3 हजार 700 कोटींची थकबाकी आहे.

2 हजार कोटींची अंदाजपत्रकीय तूट

महापालिकेच्या अंदाजपत्रकाने साडेसहा हजार कोटींचा टप्पा गाठलेला असला, तरी प्रत्यक्षात महापालिकेस अजूनही 4 हजार कोटींच्या उत्पन्नाचा टप्प्पा अजूनही गाठता आलेला नाही. त्यामुळे दरवर्षी महापालिकेस सुमारे 2 हजार कोटींची अंदाजपत्रकीय तूट येत असल्याचे चित्र आहे. त्याच वेळी पालिकेला वसूल करता येऊ शकणारी थकबाकीही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या बैठकीत सर्व विभाग प्रमुखांना थकबाकीची माहितीसह वसूल न होण्याची कारणे तसेच पुढील महिनाभरात वसुलीसाठी काय उपाय योजना राबविल्या जाणार याचा अहवाल या बैठकीत सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार, या माहितीवरून दि.1 ते 31 मार्च या कालावधीत थकबाकी वसूलीसाठी प्रत्येक विभागास उद्दिष्ट देऊन विशेष कृती कार्यक्रम राबविला जाणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.