थकीत पगारासह नियमित पगार करण्याचा खंडपीठाचा आदेश

0

फैजपूर । येथील तापी परिसर विद्यामंडळ संचलित शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालयाने सहा महिन्याच्या आत मागील थकीत पगाराची रक्कम व फेब्रुवारी 2017 पासून संबंधीत कर्मचार्‍यांचे नियमानुसार नियमित वेतन अदा करण्याचा महत्त्वपूर्ण निकाल नुकताच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. न्यायालयाच्या या आदेशामुळे कर्मचार्‍यांना दिलासा मिळाला आहे. तापी परिसर विद्यामंडळ संचलित शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालयातील कर्मचार्‍यांचे मार्च 2012 (61 महिने) पासून पगार केले नसल्याने त्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. सन 1990 साली विना अनुदान तत्त्वावर स्थापन झालेल्या या महिला बी.एड्. महाविद्यालयातील कर्मचार्‍यांचे वेतन थकित असून सुद्धा येथील कर्मचारी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीला सामोरे जाऊन विद्यार्थीनींचे हित लक्षात घेऊन संयमाने नियमित अध्ययन अध्यापनाचे कार्य करित राहिले. थकित पगारासाठी प्राचार्य, संस्थाचालक ते विद्यापीठापर्यंत लेखी तक्रार अर्ज दाखल केले.

हतबल झालेल्या कर्मचार्‍यांना मिळाला दिलासा
संबंधितांनी पगाराबाबत कोणतीही दखल घेतली नाही. उलट वेळोवेळी प्राचार्यांमार्फत दबाव तंत्राचा वापर करुन महाविद्यालय बंद करण्याची धमकी दिली. त्यामुळे या विरोधात या महाविद्यालयातील कर्मचारी प्रा.एम.बी.चौधरी, ग्रंथपाल प्रा.यु.आर.पाटील, प्रा. पिंगला धांडे, प्रा. शशिकला एस.महाजन यांनी 2014 साली खंडपीठात याचिका दाखल केली.

त्यासंदर्भात द्विसदस्यीय खंडपीठाचे न्यायमूर्ती टी.व्ही.नलावडे व न्यायमूर्ती संगितराव पाटील यांनी सुनावणी दरम्यान वरील आदेश देऊन शिक्षण संस्था चालकांनी शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजात शैक्षणिक कार्य करावे.

जेणेकरुन कर्मचार्‍यांना पगारासाठी न्यायालयात दाद मागण्याची वेळी येऊ देऊ नये असे सुनावले. या सुनावणी दरम्यान महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी मार्च 2016 पासून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी व जून 2016 पासून एलआयसीची दरमहा वर्गणीची रक्कम भरली नसल्याचा तक्रार अर्जही न्यायालयापुढे सादर केला. कर्मचार्‍यांतर्फे ज्येष्ठ कायदेपंडत अ‍ॅड. अजय. तल्हार यांनी बाजू मांडली. या निकालामुळे हतबल झालेल्या कर्मचार्‍यांना दिलासा मिळाला आहे.