थकीत पाणीपट्टीवर 10 टक्क्यांची सवलत

0

पुणे : शहरात तब्बल 7500 थकबाकीदारांनी पालिकेची सुमारे 400 कोटींची पाणीपट्टी बिले थकविली असल्याचे मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत समोर आले. या थकबाकीदारांकडून वसुलीसाठी राष्ट्रीय लोक अदालतीत दाखल केलेल्या दाव्यांमध्ये न्यायालयाकडून तडजोडीस मान्यता मिळाल्यास संबंधित थकबाकीदारांच्या बिलात 10 टक्के सूट देण्याच्या प्रशासनाच्या प्रस्तावास स्थायी समितीने मंगळवारी मान्यता दिली. गेल्या तीन वर्षांतील थकबाकीदारांनाच ही सवलत देण्यात येणार आहे.

शहरातील अनेक नागरिकांकडे महापालिकेची कोट्यवधींची पाणीपट्टी बिले थकली आहेत. या थकबाकीदारांना वारंवार नोटिसा बजावूनही ही बिले वसूल करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. या थकबाकीदारांविरोधात पालिकेच्या न्यायालयातील राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दावे दाखल केले जातात. या दाव्यांमध्ये अनेकदा महापालिकेकडून चुकीची पाणीपट्टी बिले गेल्याचे आढळून येते. बिलात तडजोड करण्याचे अधिकार महापालिका प्रशासनाला नसून त्यासाठी स्थायी समितीची मान्यता घ्यावी लागते. त्यामुळे थकबाकीचा निपटारा करण्यात अडचणी येतात. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये पाणीपट्टी थकबाकीदारांच्या बिलात तडजोडीसाठी 10 टक्के सूट देण्यासंदर्भातील प्रस्ताव पालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला होता. या प्रस्तावास स्थायी समितीने मान्यता दिली.