कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती दिवसेंगणिक ढेपाळात असल्याने ठेकेदारांची बिले ही रखडली आहेत. मनपा आयुक्तांनी घेतलेल्या आढावा बैठकीत बिले थकलेल्या ठेकेदारांच्या बिलातील 10 टक्के रक्कम देण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. या आदेशांनुसार आता ज्या ठेकेदारांची बिले 50 हजार किंवा त्याहून कमी असतील त्या ठेकेदाराच्या बिलाची संपूर्ण रक्कम दिली जाणार आहे. मोठ्या रकमा असलेल्या ठेकेदारांना बिलाच्या रकमेच्या 10 टक्के रक्कम पहिल्या टप्प्यात अदा केली जाणार आहे. त्यानुसार टप्प्याटप्प्याने ही रक्कम ठेकेदाराने याच पद्धतीने दिली जाणार असल्याचे लेखाधिकारी दिग्विजय चव्हाण यांनी सांगितले. त्यामुळे ठेकेदारांना काही अंशी दिलासा मिळणार आहे.
लेखा विभागाला आदेश
मनपा आयुक्तांनी मालमत्ता कर, शासन अनुदान, कलेक्टर अनुदानातून पालिकेच्या तिजोरीत निधी उपलब्ध होत असून या निधीचा आढावा घेतला. यानंतर शासकीय प्रकल्पासाठी आवश्यक तो भरणा केल्यानंतर काही रक्कम पालिकेच्या खात्यात शिल्लक राहत असल्यामुळे या रक्कमेतून ठेकेदाराची रखडलेली बिले काढण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. आयुक्तांनी सर्व ठेकेदारांना त्यांच्या बिलाच्या 10 टक्के रक्कम गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर अदा करण्याचे आदेश लेखा विभागाला दिले आहेत.