थकीत मालमत्ता कर भरणार्‍यांना दंडाच्या रकमेत 75 टक्के सवलत

0

मालमत्ता कराच्या संपूर्ण वसुलीसाठी महापालिकेला निर्णय

पिंपरी-चिंचवड : थकबाकीदार मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर भरावा, यासाठी महापालिकेने त्यांना थकीत मालमत्ता करावर आकारण्यात येणार्‍या दंडावर सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 1 ते 31 ऑक्टोबर या कालावधीत थकबाकीसह संपूर्ण मालमत्ताकर भरणार्‍यांचा 75 टक्के दंड माफ करण्यात येणार आहे. तसेच, 1 ते 30 नोव्हेंबरपर्यंत मालमत्ताकर भरणार्‍यांना 50 टक्के दंड माफ केला जाणार आहे.

120 कोटी रुपयांची थकबाकी
पिंपरी-चिंचवड शहरात एक लाख 27 हजार मालमत्ता आहेत. महापालिकेच्या शहरातील 15 विभागीय करसंकलन कार्यालयांमार्फत मालमत्ता कराची वसुली करण्यात येते. मालमत्ताधारकांकडे सध्या तब्बल 120 कोटी रुपयांची थकबाकी आहे. मुदतीत मालमत्ता कर न भरणार्‍यांना दरमहा दोन टक्के दराने दंड आकारण्याची तरतूद आहे. चालू आर्थिक वर्षात पहिल्या व दुसर्‍या सहामाहीची रक्कम भरणा न करणार्‍या मालमत्ताधारकांना 1 ऑक्टोबर व 1 जानेवारीपासून दरमहा दोन टक्के दराने दंड आकारला जातो.

अभय योजनेंतर्गत सवलत
मालक-भाडेकरू वाद, न्यायालयीन खटले, कौटुंबीक वाद, आर्थिक परिस्थिती या कारणांमुळे नागरिकांचा मालमत्ताकर भरण्याचा कल दिसून येत नाही. या मालमत्ताधारकांना वेळोवेळी थकीत बिलावर दोन टक्के दंड दरमहा आकारला जातो. त्यामुळे मालमत्ताकराच्या थकबाकीत दिवसेंदिवस वाढ होते. थकीत मालमत्ता कर वसूल होण्यासाठी नागरिकांकडून आकारण्यात येणार्‍या दंडावर सवलत दिल्यास मालमत्ता कर वसूल होण्यास मदत होईल. त्यामुळे मूळ रक्कम वसूल होऊन महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल. या उद्देशाने थकबाकीसह मालमत्ता कराची संपूर्ण रक्कम एकरकमी भरणार्‍या मालमत्ताधारकांना अभय योजनेंतर्गत सवलत देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.