थकीत मिळकतींसमोर ‘बँड’ वाजवणे बेकायदेशीर

0

पुणे । थकीत करदात्याच्या मिळकतीसमोर जाऊन बँड बाजा वाजविण्यासाठी पुणे महापालिकेच्या मिळकत कर आकारणी व कर संकलन विभागाने नुकतीच 25 लाख रुपयांची निविदा काढली आहे. मुंबई महापालिका अधिनियमात मिळकत कर वसुली संदर्भात वेगवेगळ्या पद्धती सांगितलेल्या आहेत. त्यात थकीत करदात्याच्या मिळकतीसमोर जाऊन बँड बाजा वाजविण्याचा समावेश नाही. त्यामुळे थकीत मिळकत करदात्याच्या मिळकतीसमोर जाऊन बँड बाजा वाजवणे बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे यासाठी पुणेे महापालिकेने काढलेली 25 लाखांची निविदा रद्द करण्याची मागणी पुणे नागरिक मंचाने
केली आहे.

निवीदा रद्द करा
बँड बाजा वाजवणे संदर्भात प्रसिद्ध केलेली सदर निविदा ही महापालिका अधिनियमाला धरून नाही. मुंबई महापालिका अधिनियमात कर वसुली संदर्भात वेगवेगळ्या पद्धती सांगितलेल्या आहेत. यात कसुरदाराची जंगम मालमत्ता जप्त करून तिची विक्री करणे, बिल सादर करणे, दावा लावणे इत्यादी पद्धती आहेत. थकीत करदात्याच्या मिळकतीसमोर जाऊन बँड बाजा वाजवणे अधिकृत असल्याबाबत या अधिनियमात कसलीही नोंद नाही. तेव्हा या प्रकारची कृती जर पालिकेचा कर आकारणी व कर संकलन विभाग करत असेल तर ती संपूर्णपणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे निविदा रद्द करावी.

…तर कायदेशीर कारवाई
थकीत मिळकत करदात्याच्या दारासमोर जाऊन बँड बाजा वाजवल्यास पुणे पालिकेच्या विरुद्ध तसेच कर आकारणी व कर संकलन विभागाच्या प्रमुखांविरुद्ध नाईलाजाने कायदेशीर तक्रार करावी लागेल, असा इशारा पुणे नागरिक मंचाचे आशिष माने यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.