थकीत रक्कम भरा अन्यथा कारवाईला सामोरे जा

0

आयुक्तांनी गाळेधारकांना सुनावले,बिल कमी करण्यासाठी गाळेधारक मनपात धडकले

जळगाव- महापालिकेच्या मुदत संपलेल्या 18 व्यापारी संकुलातील गाळेधारकांना प्रशासनाने कलम 81 क नुसार नोटीस बजावली.मात्र बिले अवाजवी असल्याने त्यातील चारपट दंड रद्द करुन शास्ती कमी करण्याच्या मागणीसाठी गाळेधारक शुक्रवारी महापालिकेत धडकलेत. यावेळी त्यांनी बिले कमी करण्याची मागणी आयुक्तांना भेटून केली तर आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांनी कायद्यानुसार यातून दिलासा देणे शासनालाही अशक्य असल्याचे सांगत थकीत रक्कम भरा अन्यथा कारवाईला सामोरे जा असा सज्जड दम देखील आयुक्तांनी गाळेधारकांना दिला.
महापालिकेच्या मुदत संपलेल्या 18 व्यापारी संकुलातील 2 हजा 387 गाळेधारकांच्या गाळ्यांची मुदत 2012 मध्ये संपुष्टात आली आहे. गाळे ताब्यात घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून, प्रशासकीय पातळीवर गाळे ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यात गाळेकारवाई केल्यानंतरचा अहवाल शासनाला पाठविण्याचे पत्र शासनाकडून महापालिकेला मंगळवारी मिळाले आहे. तसेच सेंट्रल फुले मार्केटमधील 950 गाळेधारकांना 81 क ची नुकसान भरपाईची नोटीस बजावली होती. फुले व सेंट्रल फुले मार्केटमधली सुमारे 50 गाळेधारकांनी साडेचार कोटी रुपये भरलेले आहे. त्यामुळे उर्वरित गाळेधारकांची मुदत संपल्याने त्यांच्यावर जप्तीची कारवाई करण्याची तयारी प्रशासनाने सुरु केली आहे.
प्रशासनाने दिलेली बिले अवाजवी
प्रशासनाने दिलेली नुकसानभरपाईची बिले अवाजवी आहे. यातील चारपट दंड बेकायदेशीर असल्याचा आरोप करीत शुक्रवारी मुदत संपलेल्या गाळेधारक संघटनांच्या क ोअर कमेटीचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली गाळेधारकांनी मनपात धडक दिली. यावेळी डॉ. सोनवणे यांच्यासह गाळेधारकांच्या शिष्टमंडळाने आयुक्त डा ॅ. उदय टेकाळे यांची भेट घेतली. यावेळी आयुक्तांसोबत उपायुक्त उत्कर्ष गुटे उपस्थित होते.
गाळेधारकांना दिलेले बिल योग्यच-आयुक्त
आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांनी गाळेधारकांना दिलेले बिल योग्यच असल्याचे सांगितले. यामध्ये कुठल्याही रकमेची कपात होणार नाही. दिलेली बिले योग्य आहेत. ती भरा विच लागतील. तुम्ही कुठेही गेले तरी तुम्हाला दिलासा मिळेल असे वाटत नाही. त्यामुळे तुम्ही त्वरित बिले भरून गाळे लिलावाचा मार्ग मोकळा करावा असा सल्ला आयुक्तांनी दिला आहे.सन 2012 तर 2019 पर्यंत गाळेधारकांनी पैसे भरले नसल्यामुळे नुकसान भरपाईवर दोन टक्के शास्ती, एका वर्षासाठी चारपट दंड, जीएसटी व सेवाशुल्क आदींचा समावेश बिलांमध्ये करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ.शांताराम सोनवणे यांनी मांडली गाळेधारकांची भूमिका
गाळेधारकांच्या वतीने कोअर कमिटीचे अध्यक्ष शांताराम सोनवणे यांनी गाळेधारकांची भूमिका मांडली. सन 2012 पर्यंत गाळेधारकांना रेडीरेकनर नुसार दर आकारण्यात आले नाही. त्यामुळे आत्ताच सर्व बिले का आकारण्यात येत आहेत. 2012 पूर्वी भाडे आकारणी केली जात होती, त्यामध्ये दोन तीन टक्के किंवा चार ते पाच टक्के वाढ करून बिले आकारण्यात यावी . मनपाने दिलेली बिले अवाजवी आहेत .बिले भरताना 80 टक्के गाळेधारक असमर्थ आहेत .त्यामुळे गाळेधारकांना आपले विशेष अधिकार वापरून बिलामध्ये कपात करून द्यावी अशी मागणी डॉ. सोनवणे यांनी केली.पालकमंत्री गिरीष महाजन यांना भेटल्यानतंरच पुढील भूमिका ठरविणार असल्याचे ते म्हणाले.
फेरमुल्यांकन करुन दिलीत बिले
मनपाच्या मुदत संपलेल्या 18 व्यापारी संकुलातील गाळेधारकांना आधी सरसकट बिले दिली होती. मात्र न्यायालयाच्या आदेशानंतर फेरमूल्यांकन करण्यात येऊन दि.30 जूनपर्यंत नवीन बिले देण्यात आली. आधी दिलेल्या बिलांमध्ये जवळपास 40 ते 45 टक्के व्यापार्‍यांची बिले कमी झाली आहेत. 192 कोटीची थकबाकी 112 कोटीवर आली अहे. तरी देखील बिल भरण्यात जेवढा उशीर कराल तेवढे व्याज तुम्हाला लागेल, आणि तुमचा आर्थिक बोजा वाढत जाणार आहे.त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर बिले भरावीत अन्यथा होणार्‍या परिणामास तुम्ही जबाबदार राहाल अशी परखड भूमिका आयुक्त टेकाळे यांनी गाळेधारकांसमोर मांडली.