थकीत वीजबिलामुळे शासकीय वसतिगृहाचा मीटर काढला

0

मार्च अखेर वीजबील भरण्याचे आश्‍वासनानंतर वीजपुरवठा सुरळीत

येरवडा : येरवडा परिसरातील शासकीय वसतिगृहाचे वीज बिल थकल्यामुळे महावितरण विभागाच्या वतीने वीजमीटर काढण्याचा प्रकार घडल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करण्याची वेळ आली. याबाबत वसतिगृहातील अधिकारी यांनी संध्याकाळी उशिरा विश्रांतवाडी उपकेंद्राचे अधिकारी संजय घोडके यांची भेट घेऊनं मार्च अखेर बिल भरण्याचे आश्‍वासन दिल्यानंतरच संध्याकाळी परिसरात वीज मीटर बसवून खंडीत असलेला वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

येरवडा परिसरातील गोल्फ चौक परिसरात कोट्यावधी रुपये खर्च करून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने इमारत उभारून त्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह असे नामकरण करून या ठिकाणी राज्यभरातील जवळपास 150 ते 200 विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणाचा लाभ घेत आहेत. मात्र सध्या मार्च अखेर असल्याने महावितरण विभागाच्या वतीने थकबाकी मोहीम सुरू आहे. सध्या सर्वत्र दहावीच्या परिक्षासह वार्षिक परीक्षा सुरू आहेत. मात्र दोन दिवसापूर्वी महावितरण अधिकार्‍याच्या आदेशानुसार येथील कर्मचार्‍यांनी वसतिगृहातील वीज मीटरच काढून नेल्याने वसतिगृहातील अधिकारी व विद्यार्थ्यांना अडचणी आल्या.

शासकीय अधिकारी जर महावितरण विभागास समाजातील गोरगरीब व गरजूवंत मुलांच्या शिक्षणापेक्षा त्यांना त्यांचे वीजबिल जर महत्वाचे वाटत असेल तर त्यांनी यापूर्वीच वसतिगृहास वीज पुरवठा द्यायचे नव्हते. कारण आज विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्‍न असल्याने महावितरण अधिकार्‍यांनी यावर थोडा फार विचार करूनच वीज पुरवठा खंडीत करायला पाहिजे होता.
-मेनका कराळेकर
सचिव,बसपा

महावितरण हे विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळत असून त्यांनी केलेला प्रकार हा फार
चुकीचा असून एक तर सध्या दहावीच्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे करिअर महत्वाचे आहे. पण महावितरणच्या वतीने वीज मीटर काढण्यात आल्याने हे फार चुकीचे असून भविष्यात जर महावितरणच्या वतीने शासकीय वसतीगृहाचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला तर विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरू
सनी पंजाबी
उपविभाग अध्यक्ष, मनसे

भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये. जेणे करून विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. त्यामुळे महावितरण विभागाच्या अधिकार्‍यांनी देखील यावर विचार करूनच कारवाई करायला हवी होती . त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय नुकसान होत असेल तर त्यांच्या न्यायासाठी वेळ प्रसंगी पक्षाच्या वतीने आपण रस्त्यावर उतरू.
– महेश पाटील
कार्याध्यक्ष,राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियन