थकीत वेतनासाठी वॉटरग्रेस कंपनीच्या कामगारांचा मनपासमोर ठिय्या

0

कामबंद ठेवण्याचा दिला इशारा;प्रवेशद्वारासमोर जोरदार घोषणाबाजी

जळगाव- करारानुसार काम करत नसल्याने शहरातील कचरा संकलनासह स्वच्छतेचा ठेका घेणार्‍या ’वॉटरग्रेस’ कंपनीच्या विरोधात प्रक्षोभ वाढत चालला आहे. गुरुवारी दुपारी सुमारे दीडशे ते दोनशे सफाई कर्मचार्‍यांनी थकीत वेतनाच्या मागणीसाठी महापालिका इमारतीच्या आवारात ठिय्या मांडला. थकीत वेतन देण्यासह वॉटरग्रेसचा ठेका रद्द करावा, अन्यथा शुक्रवारपासून काम बंद आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी कर्मचार्‍यांनी दिल्याने जळगावात पुन्हा एकदा कचराकोंडी होण्याची शक्यता आहे.

सफाई कर्मचार्‍यांच्या संतापाचा उद्रेक
जळगाव शहरातील कचरा संकलनासह स्वच्छतेसाठी 5 वर्षांचा 75 कोटी रुपयांचा ठेका नाशिकच्या वॉटरग्रेस कंपनीला देण्यात आला आहे. ऑगस्ट 2019 पासून वॉटरग्रेसने कामाला सुरुवात केली. मात्र, सुरुवातीपासून करारनाम्यानुसार काम करत नसल्याने वॉटरग्रेसबाबत असंख्य तक्रारी आहेत. सफाई कर्मचार्‍यांना किमान वेतन देणे, आवश्यक ती साधने पुरवणे, गणवेश देणे असे साधे निकषही वॉटरग्रेसने पाळलेले नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे, ऑगस्ट महिन्यापासून कामाला सुरुवात झाल्यावर सफाई कर्मचार्‍यांना एकाही महिन्याचे पूर्ण वेतन दिलेले नाही. कर्मचार्‍यांना गरजेनुसार उचल स्वरुपात काही रक्कम देऊन वेळ मारून नेण्याचा प्रकार सुरू आहे. किमान वेतन क ायद्यानुसार प्रत्येक कर्मचार्‍याला दरमहा वेतन मिळत नसल्याने गुरुवारी सफाई कर्मचार्‍यांच्या संतापाचा उद्रेक झाला. सुमारे दीडशे ते दोनशे सफाई कर्मचार्‍यांनी महापालिके च्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या मांडत जोरदार घोषणाबाजी केली.

वॉटरग्रेसकडे 400 कर्मचारी साफसफाईसाठी, 125 कर्मचारी घंटागाड्यांवर तर 25 मुकादम म्हणून कार्यरत आहेत. सर्वांचे किमान तीन ते साडेतीन महिन्यांचे वेतन रखडले आहे. वेळोवेळी मागणी करुनही थकीत वेतन मिळत नसल्याने सफाई कर्मचार्‍यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून गुरुवारी महापा लिकेच्या आवारात ठिय्या मांडण्यात आला. उद्या कामबंद आंदोलन पुकारण्यात येणार आहे. तरीही वेतनाचा प्रश्न मार्गी लागला नाही तर सर्व कर्मचारी वॉटरग्रेस कंपनीच्या एप्रोनची जाहीर होळी करणार असल्याचा इशारा कामगार युनियनचे अजय घेंगट यांनी दिला.

मक्तेदाराने त्रुटींची पूर्तता करावा
कामगारांना पगार देणे मनपाचे नाही तर मक्तेदाराचे काम आहे. मक्तेदाराने बिल दिल्यानंतर त्रुटींची पूर्तता करण्यास विलंब केलेला आहे.त्यांनी त्रुटींची पूर्तता करावी. क ामगारांनी अचानकपणे कामबंद केल्यास मक्तेदारावर कारवाई करण्यात येईल.-मिनिनाथ दंडवते,उपायुक्त, मनपा