श्रावणाच्या वद्य अष्टमीस भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. हीच अष्टमी आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी वा श्रीकृष्ण जन्मोत्सव म्हणून साजरा करतो. या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री पाळण्यातील श्रीकृष्णाचा जन्मोसव साजरा करून उपवास सोडला जातो. दुसर्या दिवशी काला म्हणजे दहीकाला/दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. खरंतर आपण आपले सण, उत्सव समजून उमजून साजरे न करता नुसतं साजरा करण्यात धन्यता मानतो.
कृष्णानी हंडी का फोडली? हे जर थरात चढणार्या गोविंदाला विचारलं तर त्यांच्या तोंडून एकच उत्तर येईल कृष्णाने हंडी फोडली! कृष्ण माखनचोर होता म्हणून अरे पण कृष्ण राजाचा मुलगा होता त्याला काय गरज चोरीची? खरं तर त्याकाळात दूध, लोणी कसांच्या राज्यात म्हणजे मथुरेत निर्यात होत असे. त्यामुळे तेथील रहिवाशांचे व्यवस्थित पोषण होत नसे. त्यावर सर्वप्रथम अधिकार गोकुळवासीयांचा असल्याने कृष्णाने तो त्यांना मिळावा यासाठी प्रयत्न केले म्हणजेच त्याने संस्कृतीसाठी हंडी फोडली. पण आजची हंडीचे रूप ते काय?
कसली हो हंडी
पैशांचा खेळ सारा…
पथकाची पथक
नेत्यांच्याच आहारा…
आज राजकारणी मंडळींनी गोकुळाष्टमीचे पारंपरिक रूप बदलून बाजारी स्वरूप दिले आहे. मग यात छोट्या राजकारण्यांपासून ते बड्या नेत्यांचा समावेश येतो. पूर्वी गोकुळाष्टमी साजरी करताना हंडीची उंची कमी असायची त्यामुळे दुखापत होण्याची संभाव्यता कमी असायची. आता इव्हेंटचं स्वरूप आल्याने नऊ-नऊ थर रचले जातात आणि यात अनेक गोविंदा जखमी होतात. काही मृत्युमुखी पडतात. मग हा आकडा न मोजण्याइतपत जातो आणि अनेक कुटुंबेही उद्ध्वस्त होतात. आत्ता तर सरकारने थरांवरील बंदीही मागे हटवली आहे. मध्यंतरी जेव्हा बंदी होती तेव्हा एका पक्षाच्या अध्यक्षांनी सांगितले होते की तुम्ही लावा थर पोलिसांना मी बघून घेतो. हेच विधान जर त्यांनी तुम्ही लावा थर तुमच्या नोकरी-व्यवसायासाठी मी बघतो वा तुम्हाला नोकरी-व्यवसाय उपलब्ध करून देतो, असे म्हटले असते तर फार प्रगल्भ ठरले असते ना? अनेक गोविंदा पथके थराला जाताना कोणती जोखीम येऊ नये म्हणून महिने-दोन महिन्याअगोदर आपला वेळ खर्ची करून पूर्वतयारी करत असतात. थर करताना त्यांचे अथक प्रयत्न, जिद्द, चिकाटी दिसतेच वा असते. परंतु, फळास काय? बक्षीस वा बक्षिसाची रक्कम? राजकारण्यांच्या दहीहंडीचे थर याच थरापर्यंत जाऊ शकतात. त्या गोविंदांची भविष्याची काळजी जेव्हा या आयोजकांना दिसेल तेव्हा कृष्णाच्या जन्मोसत्वाचे खरे फलित होईल. देशाचं भविष्य असणारे हे तरुण स्वत:च्या पायावर उभे राहिलेले हवेत की पायाने अपंग झालेले हवेत? याचा अर्थ असा जरूर नाही की आपण आपले सणवार साजरे करू नये? नक्कीच करू यात, पण प्रत्येक भारतीय सणाच्या परंपरे मागे काही तत्त्वे आणि कारणे असतात, ते समजून जर आपण कृती केली, तर आपले जीवन नक्कीचं आनंदमय होऊन उत्सवांप्रमाणे फुलणारचं. परंतु, आजच्या परिस्थितीत उंच उंच थरांच्या मागे न लागता आपले जीवन कसे सुरक्षित राहील, याकडे आपले लक्ष असले तर प्रत्येक सणाचा आपल्याला आनंद घेता येईल मित्र हो.
– सर्वेश तरे
लेखक/कवी, आगरायन