थर्टीफस्टला पहाटेपर्यंत झिंग झिंग झिगाट

0

हॉटेल्स-बिअरबारमध्ये आर्किस्ट्राची धूम ; गुलाबी थंडीत रंगणार भरीत पार्ट्या

भुसावळ- सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत अर्थात ‘थर्टी फस्ट’चे सेलिब्रेशन म्हणजे तळीरामांसाठी जणू पर्वणीच…नववर्षाच्या स्वागतासाठी शहरातील हॉटेल्ससह बिअरबार रोशनाईने व डेकोरशनने सजले असून महामार्गावरील ढाब्यांवरही जय्यत तयारी करण्यात आली आहे शिवाय खवैय्यांसाठी खास शाकाहारी तसेच मांसाहारी पदार्थांचे विविध प्रकार उपलब्ध करून देण्यात आले आहेत तसेच ठिकठिकाणी शेतातसह घराच्या गच्चीवरही भरीत पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. मांसाहारी खवैय्यांची पहिली पसंत असलेल्या ‘कडकनाथ’ या कोंबडी व कोंबडीच्या प्रकाराला रविवारच्या आठवडे बाजारात विशेष मागणी राहिली तर शहरातील मद्य विक्रेत्यांनीही तळीरामांसाठी खास जादा मद्यसाठ्याची तरतूद केली आहे. मद्य पिवून होणारे अपघाताचे प्रमाण पाहता तळीरामांच्या बंदोबस्तासाठी पोलिस प्रशासनाकडून मद्यपींविरुद्ध ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हची कारवाई होणार असून पेट्रोलिंग पथकाद्वारेही कारवाई केली जाणार आहे.

पहाटेपर्यंत सुरू राहणार बिअर-बार
तळीरामांसाठी पहाटेच्या पाच वाजेपर्यत परमीटरूम बिअर-बार सुरू ठेवण्यात येणार असून मद्य विक्रीच्या दुकानांना मात्र रात्री एक वाजेपर्यंत मद्य विकण्याची मुभा देण्यात आली आहे. तळीरामांनी कटू कारवाई टाळण्यासाठी एक दिवसीय मद्य विक्रीच्या परवान्याचा वापर करावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे. देशी दारूसाठी दोन रुपये तर विदेशी दारूसाठी अवघे पाच रुपये शुल्क आकारण्यात येणार असून मद्य विक्रीच्या दुकानांमध्येही हा परवाना उपलब्ध करून देण्यात आला आहे.

तळीरामांचा उतरणार थर्टी फर्स्ट फिव्हर
मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणे धोकादायक असल्याने व त्यातून अपघातासारखे गंभीर प्रकार घडत असल्याने पोलिस प्रशासनाची तळीरामांवर करडी नजर राहणार आहे. पोलिसांकडून तळीरामांविरोधात थर्टी फर्स्ट फिवर उतरेपर्यंत शहरात कठोर कारवाईचा बडगा उचलणार आहेत. शहर, बाजारपेठ व तालुका पोलिस ठाण्यासह शहर वाहतूक शाखेतर्फे फिक्स पॉईंट लावून ब्रिथ अ‍ॅनालायझर मशीनद्वारे तळीरामांची चाचणी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहेत शिवाय पेट्रोलिंग पथकाद्वारेही कारवाई केली जाणार आहे.

नो डीजे ; लाऊड स्पीकरला परवानगी
डीजेला बंदी असल्याने पार्टीत डीजेचा वापर होत असल्याचे आढळल्यास पोलिसांकडून कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड म्हणाले तर रात्री 12 वाजेपर्यंत केेवळ लाऊड स्पीकरचा वापर करता येणार असल्याचेही ते म्हणाले. शहर व तालुक्यात बनावट दारूचा पुरवठा होण्याची शक्यता पाहता राज्य उत्पादन शुल्क विभागासह पोलिसांच्या पथकाद्वारे गस्त घालून कारवाई केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

भरीतासह मांसाहारी पार्ट्यांचे आयोजन
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तरुणाई सज्ज झाली असून त्यासाठ खास भरीत पार्ट्या व मांसाहारी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले. हॉटेल्स, बारसह ढाबे तसेच घराच्या गच्चीवर, गल्लीत व शेतात गुलाबी थंडीत या पार्ट्या रंगणार आहे. मटण-चिकण विक्रेत्यांनी आतापासून बोकड तसेच कोंबड्यांचा साठा केला आहे तर रविवारच्या बाजारात ‘कडकनाथ’ कोंबडी-कोंबडीच्या प्रकारालादेखील मोठी मागणी राहिल्याचे चित्र होते.