पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली माहिती
मुंबई : वर्षाचा शेवटचा आठवडा सुरू झाला की सर्वांना 31 डिसेंबर अर्थात थर्टी फस्टचे वेध लागते. थर्टी फस्टचा आनंद लुटण्यासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जाते. यावर्षी मात्र हा थर्टी फस्टचा आनंद लोकांना डीजेविना साजरा करावा लागणार आहे. 31 डिसेंबरला राज्य सरकारकडून डीजे वाजविण्यास बंदी घालण्यात आली असल्याची माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी जनशक्तिशी बोलताना दिली. राज्यात ध्वनी प्रदूषणाबाबत सरकारने कडक कायदे केले असून खासकरून मुंबई , पुणे , नागपुर आणि नाशिक सारख्या मोठ्या शहरात डीजे वाजविण्यास परवानगी देण्यात येणार नसल्याचे पर्यावरण मंत्री कदम यांनी सांगितले.
सरकारकडून साउंड वाजविण्याविषयी दिलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे कदम यांनी यावेळी सांगितले. या संदर्भात मंगळवारी कदम यांनी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यासह राज्याचे पोलीस महानिरीक्षक व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठक बोलाविली होती. बैठकीनंतर कदम यांनी सांगितले की, नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात काही आमदारांनी 31 डिसेंबरला पार्ट्यांमध्ये वाजविला जाणारा डीजे आणि कर्णकर्कश साऊंडचा मुद्दा उपस्थित केला होता. यामुळे सरकारने तातडीने पाऊले उचलत हा निर्णय घेतला आहे. थर्टी फस्टला डीजे किंवा मोठ्या आवाजात कर्णकर्कश संगीत वाजल्यास कारवाई करण्याबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिले असल्याचे कदम म्हणाले.
यावेळी कदम म्हणाले मोठ्या हॉटेल्स आणि कार्यक्रमांच्या आयोजकांना याबाबत सूचना दिल्या आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. कदम म्हणाले की, पोलीस विभागाने 55 ते 65 डेसीबल आवाजाची परवानगी दिली आहे. या नियमात डीजेसारखे वाद्य बसत नाहीत. नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी सरकारकडून काळजी घेत असल्याचे कदम म्हणाले.