आतापर्यंत पोलिस उपनिरीक्षकासह 12 पोलिसांवर कारवाई
कोल्हापूर : सांगलीतल्या अनिकेत कोथळे थर्ड डिग्री मृत्यूप्रकरणी आणखी 7 पोलिसांना निलबित करण्यात आले आहे. ठाणे अंमलदारासह त्याचा मदतनीस आणि रात्री ड्यूटीवर असणार्या 4 पोलिस कर्मचार्यांचा यात समावेश असून या हत्येप्रकरणी आतापर्यंत पोलिस उपनिरीक्षकासह 12 पोलिसांवर कारवाई झाल्याने राज्य पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
हत्येचा तपास सीआयडीकडे
अनिकेत कोथळे आणि अमोल भंडारे या दोघांना दमदाटी, जबरदस्ती करुन पैसे उकळण्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी ताब्यात घेतले होते. कोठडीत पोलिसांनी अनिकेत कोथळेवर थर्ड डिग्रीचा वापर केला. त्यातच त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे पोलिसांकडून अनिकेतचा मृतदेह जाळून टाकून, या दोन्ही आरोपींनी पालायन केल्याचा बनाव रचल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक युवराज कामटेसह 5 पोलिसांना अटक करण्यात आली. तसेच या हत्येचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आल्याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली आहे.
आयोगाकडून महासंचालकांना नोटीस
पोलिसांनी अनिकेतचा मृतदेह आंबा घाटात नेऊन जाळल्याची धक्कादायक बाबही उघड झाली. कोल्हापूर रस्त्यावर एका अभियंत्यास चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी अनिकेत (वय 26) आणि अमोल भंडारी (वय 23) या तरुणांना अटक केली होती. विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या बाजूला डिटेक्शन ब्रँचचे ऑफिस असून सोमवारी रात्री दोन्ही आरोपींना चौकशीसाठी डिटेक्शन ब्रँचच्या कार्यालयात नेले जात होते. या दरम्यान दोन्ही आरोपींनी पळ काढल्याचे पोलिसांनी म्हटले होते. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक युवराज कामठे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद देत गुन्हादेखील नोंदवला होता. यातील अमोल हा निपाणीत सापडला होता तरी अनिकेतचा थांगपत्ता लागत नव्हता. दरम्यान, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याप्रकरणाची दखल घेतली असून पोलिसांनी थर्ड डिग्री वापरल्यामुळे आरोपीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी राज्याचे महासंचालक सतीश माथूर यांना आयोगाने नोटीस बजावली आहे.
सीसीटीव्ही फुटेजमधून हत्येचे चित्रणच गायब
उपनिरीक्षक कामटे आणि त्याच्या टोळीने अनिकेत कोथळेचा सुपारी घेऊन खून केल्याचा पुनरुच्चार करीत अनिकेत कामाला असलेल्या लकी बॅग दुकानाचा मालक निलेश खत्री, गिरीश लोहाना आणि संबंधित ठाणे अंमलदारासह त्यावेळी उपस्थित पोलीस कर्मचार्यांची कसून चौकशी करावी, अशी मागणी कोथळेंच्या नातेवाईकांनी केली आहे. अनिकेत कोथळे हत्या प्रकरणातील पुरावा असलेल्या सीसीटीव्ही फुटेजचेही गूढ वाढले आहे. या घटनेच्या दिवशीच्या सीसीटीव्ही फुटेजमधून अनिकेतच्या हत्येचे चित्रणच गायब करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कुणाचीही गय करणार नाही
या घटनेला जबाबदार असेलेल्या बारा पोलीसांवर कारवाई केली आहे. आणखी कोण दोषी असतील तर त्याच्यावर ही कारवाई करण्यात येईल. या प्रकरणात वरिष्ठ अधिकारी सहभागी असले तरी त्याची गय केली जाणार नाही. पोलीस अधीक्षकांची या प्रकरणातील भूमिका तपासली जाईल.
-दीपक केसरकर, गृहराज्यमंत्री