डॉ.युवराज परदेशी: दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता रजनीकांत यांच्या नावे अचाट व अशक्यप्राय वाटणारे अनेक जोक्स व किस्से सोशल मीडियात सातत्याने व्हायरल होत असतात. आताही एक मेसेज प्रचंड व्हायरल होत आहे, तो म्हणजे ‘राजकारणात प्रवेश न करत पक्ष सोडण्याची कामगिरी फक्त रजनीकांतच करु शकतात…’ अर्थात यातील गंमतीचा भाग सोडला तर काही प्रमाणात ते खरचं आहे. कारण रजनीकांत यांनी डिसेंबर 2017 मध्ये तामिळनाडूत राजकीय पक्ष स्थापन करत असल्याची घोषणा केली होती. जयललिता आणि करुणानिधी यांच्या निधनानंतर ही घोषणा करण्यात आली होती. मात्र 2019च्या लोकसभा निवडणुकीत रजनीकांत यांनी सहभाग घेतला नव्हता. पण आता 3 डिसेंबर रोजी आपला राजकारण प्रवेश करण्याचा इरादा असल्याचे घोषित करून मोठीच सनसनाटी उडवून दिली होती. त्यांनीच जाहीर केलेल्या निर्णयानुसार येत्या 31 डिसेंबर रोजी ते आपल्या पक्षाची घोषणा करणार होते व पाच महिन्यांनी होणार्या तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरणार होते. राजकारण प्रवेशाबाबत ‘नाऊ ऑर नेव्हर’ असा उल्लेख देखील त्यांनी स्वत:च केला होता मात्र अचानक राजकारणात प्रवेश न करण्याचा निर्णय घोषित करुन त्यांनी मोठा धक्काच दिला आहे.
‘थलाइवा’ म्हणून ओळखल्या जाणार्या रजनीकांत यांच्या राजकीय एन्ट्रीमुळे तामिळनाडूच्या राजकारणाची गणितेच बदलण्याची चिन्हे दिसत असतानाच रजनीकांत यांनी आपल्या चाहत्यांना आणि समर्थकांना उद्देशून एक जाहीर पत्र लिहून प्रकृतीच्या कारणामुळे राजकारणात न पडण्याचा निर्णय आपण घेतला आहे, असे कळवले आहे. त्याबद्दल त्यांनी चाहत्यांची माफीही मागितली आहे. हा निर्णय घेणे किती क्लेषदायक आहे याची माझ्या खेरीज कोणालाही कल्पना येणार नाही, पण अत्यंत दु:खी अंतकरणाने आपण हा निर्णय घेत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. 2021मध्ये तामिळनाडूची विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचा हा राजकारणात न उतरण्याचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. रजनीकांत यांच्या राजकारणात येण्याच्या चर्चा यापूर्वीही बर्याचदा झाल्या होत्या.
एवढचं नव्हे तर ते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशीही चर्चा रंगली होती. त्याआधी तीन वर्षांपूर्वी रजनीकांत यांनी राजकीय पक्ष स्थापल्याचे जाहीर केले होते. मध्यंतरी कमल हासन यांच्या बरोबरीने काम करण्याची इच्छाही व्यक्त केली होती. पुढे काही झाले नाही. अशातच त्यांच्या प्रकृतीविषयी वावड्या उठल्या. पण रजनीकांत यांनी मोठी घोषणा करत सर्वच चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे तामिळनाडूतील राजकीय समीकरणे पुन्हा बदलणार आहेत. त्यांना हाताशी धरून तामिळनाडूत शिरकाव करण्याचा प्रयत्न भाजपने सुरू केला होता. पण रजनीकांत यांच्या या निर्णयामुळे भाजपची सर्वात मोठी गोची झाली आहे. कारण तामिळनाडूत सत्ताधारी अण्णा द्रमुक पक्षाशी युती करून भाजपने ‘मिशन तामिळनाडू’चा बिगुल वाजवला होता. भाजपाचे ‘मिशन तामिळनाडू’ हे केवळ विधानसभा निवडणुकांपुरता मर्यादित नसून याकडे 2024च्या लोकसभेची तयारी म्हणून पाहिले जात होते. तामिळनाडूत भाजप हा कधीच लक्षवेधी पक्ष नव्हता. परंतू तेथे पाय रोवण्याची तयारी भाजपाने 2014 सुरु केली होती. तेथे पहिल्या टप्प्यात भाजपाने 20 लाख नवे सदस्य तयार केले. 2015 मध्ये भाजपचे 40 लाख सदस्य होते. आतातर अण्णा द्रमुख पक्षाशी युती करुन भाजपाने शड्डू ठोकण्याची तयारी सुरु केली. पण रजनीकांत यांनी राजकारण प्रवेश करण्याची घोषणा केल्यानंतर भाजपने अद्रमुकला वार्यावर सोडून आम्ही अद्रमुकबरोबर राजकीय आघाडी करण्याचा अजून अंतिम निर्णय घेतलेला नाही, अशी पलटी खाल्ली.
रजनीकांत यांच्या सोबत गेल्यास सत्तेच्या खूर्चीपर्यंत लाल गालिचा अंथरुन मिळेल, अशी भाजपाला आशा होती. त्याचे कारण म्हणजे दक्षिणेतील राजकारण हे व्यक्तिवादी आणि भक्तिवादी आहे. द्रमुकचे दिवंगत अण्णा दुरई यांच्यांपासून सत्तरच्या दशकाच्या अखेरीस चित्रपट अभिनेते एम.जी.रामचंद्रन(एमजीआर) त्यानंतर करुणानिधी आणि अम्मा अर्थात जयललिता यांच्यापर्यंताचा हा प्रवास त्याचेच प्रतिबिंब आहे. लोकांवर प्रभाव टाकणारा लोकप्रिय अभिनेता हेच तेथील लोकांचे सर्वस्व असते. पण रजनीकांत यांच्या आजच्या निर्णयामुळे भाजपच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला आहे. एकीकडे रजनीकांत यांनी हा निर्णय घेतला व दुसरीकडे अद्रमुकनेही भाजपाला लाथाडले आहे. अद्रमुकने आपल्या एका राजकीय मेळाव्यात भाजपबाबत स्पष्ट भूमिका घेत नमूद केले आहे की आम्ही भाजपबरोबर युती केली आणि आमची युती सत्तेवर आली तरी भाजपला आम्ही सरकारमध्ये स्थान देणार नाही. कारण भाजप हा द्रविडी संस्कृतीतील पक्ष नाही. त्यामुळे त्यांना तामिळनाडूच्या राजकारणात मध्यवर्ती भूमिका बजावता येणार नाही.
पलानीस्वामी यांनाच त्यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून मान्यता द्यावी लागेल. यामुळे तामिळनाडू भाजपाची गत ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली आहे. रजनीकांत यांनी आपल्या राजकारण प्रवेशाचा निर्णय कायम ठेवला असता तर तेथील सारेच प्रस्थापित राजकीय पक्ष गॅसवरच राहिले असते. आता त्यांच्या या निर्णयामुळे द्रमुक व अद्रमुक या पक्षाच्या नेत्यांनी निश्चितच सुस्कारा सोडला असेल. आधी एडीएमकेशी हातमिळवणी करून भाजपने काँग्रेसची वाट खडतर केल्याचे मानले जात होते. दुसरीकडे द्रमुकचे स्टॅलिन यांचे थोरले बंधू अलागिरी यांनी स्वतंत्र पक्ष स्थापण्याची घोषणा केल्याने द्रमुक कमकुवत होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात पाय रोवण्यास भाजपला संधी होती मात्र आता भाजपाची डोकंदुखी निश्चितपणे वाढली आहे. भाजपाची दक्षिणायन मोहिम दिसते तशी सोपी नाही. कारण जनसंघापासून सुरु झालेला भाजपाचा प्रवास पाहता भाजपाची प्रखर राष्ट्रवादी पक्ष अशी प्रतिमा राहिली आहे. त्याच्या अगदी उलट दक्षिणेकडील राज्यांची विशिष्ट सांस्कृतिक ओळख आहे. तमिळ किंवा द्रविड उपराष्ट्रीयतेसाठी भाजप आपल्या राष्ट्रीयतेत किती जागा निर्माण करू शकेल हे पाहावे लागणार आहे.