चेन्नई : तामिळ जनतेसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. सुपरस्टार रजनीकांत यांनी स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन करण्याची रविवारी घोषणा केली. तसेच, 2021 मध्ये तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत सर्व 234 जागा लढवणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. सर्व जागांवर आपल्यालाच निश्चित विजय मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सहभागी होणार नाही, असेही त्यांनी जाहीर करून भाजप सरकारला दिलासा दिला. चेन्नईतील राघवेंद्र सभागृहात राज्यभरातून आलेल्या आपल्या हजारो चाहत्यांसमोर रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेशाची घोषणा केली. रजनीकांत यांच्या निर्णयामुळे तामिळनाडूच्या राजकीय समीकरणात बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राजकारण प्रवेशाबद्दल टीका अन् स्वागतही!
गेल्या अनेक दिवसांपासून रजनीकांत राजकारणात येणार असे संकेत दिसून येत होते. सध्या लोकशाही चुकीच्या वळणावरून जात असून, राजकारणात अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. बाकीचे राज्य आपली (तामिळनाडू) खिल्ली उडवत आहेत. अशावेळी हा निर्णय घेऊन तामिळनाडूच्या जनतेसाठी कार्य करणे ही माझी जबाबदारी आहे, असे मत त्यांनी या कार्यक्रमात व्यक्त केले. मी प्रसिद्धीसाठी नाही तर तामिळनाडूच्या जनतेसाठी राजकारणात प्रवेश करत आहे, असेही ते यावेळी म्हणाले. रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करणार असल्याची घोषणा केल्यानंतर चाहत्यांसह राजकीय क्षेत्रातून काहींनी त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले तर काहींनी नकारात्मक सूर आवळत त्यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. भाजपनेते डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी रजनीकांत यांच्यावर टीकास्त्र सोडले. रजनीकांत यांनी फक्त प्रसिद्धीमाध्यमांत चर्चेत राहण्यासाठी हा निर्णय जाहीर केला असल्याचे स्वामी यांनी म्हटले. रजनीकांत हे अशिक्षित असून, राजकीय वाटचालीबाबत सुस्पष्टता नसल्याचे स्वामी म्हणाले. रजनीकांत आपल्या पक्षाचे नाव आणि उमेदवार घोषित केल्यानंतर अनेक खुलासे करणार असल्याचा इशारा डॉ. स्वामी यांनी दिला.
रजनीकांतने भाजप प्रवेश टाळला
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर रजनीकांत यांच्या राजकारण प्रवेशाची चर्चा रंगली होती. भाजपनेत्यांनी रजनीकांत यांच्याशी भेटीगाठी घेतल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच 31 डिसेंबररोजी आपण राजकीय प्रवेशाबाबत घोषणा करणार असल्याचे रजनीकांत यांनी म्हटले होते. रजनीकांत यांच्या निर्णयाचे अभिनेता कमल हसन यांनी स्वागत केले आहे. माझा भाऊ रजनीकांतला राजकारण प्रवेशाच्या शुभेच्छा देत असल्याची प्रतिक्रिया कमल हसन यांनी व्यक्त केली. कमल हसन यांनी याआधीच राजकारणात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनीदेखील रजनीकांत यांना शुभेच्छा दिल्या आहेत. रजनीकांत यांना यशासाठी शुभेच्छा देत असल्याचे अमिताभ यांनी ट्विटरवर म्हटले. रजनीकांत यांच्या राजकारण प्रवेशाची घोषणा ही वर्षाच्या शेवटच्या दिवशी वर्षातील मोठी बातमी ठरली असल्याचे अभिनेते अनुपम खेर यांनी म्हटले.
सत्य, काम आणि विकास हा आपल्या पक्षाचा मंत्र आहे. तामिळनाडूच्या राजकारणात बदल करण्याची वेळ आली असून, व्यवस्था परिवर्तन करणार आहोत. लोकशाही सध्या वाईट अवस्थेत असून दुसर्या राज्यातील लोक आपली थट्टा उडवतात. लोकशाहीच्या नावाखाली राजकीय नेते लोकांची लूट करतात. हे चित्र आपल्याला बदलायचे आहे.
– रजनीकांत, ज्येष्ठ अभिनेते