थाटात काटापूजन मात्र बारदानाअभावी रखडली धान्य खरेदी

0

भुसावळात शासकीय ज्वारी-मका धान्य खरेदीबाबत शासनाने चालवली शेतकर्‍यांची थट्टा ; 300 शेतकरी धान्य खरेदीसाठी वेटींगवर ; 15 दिवसात मोजणी होणार कशी ?

भुसावळ- गोडावूनअभावी रखडलेल्या शासकीय ज्वारी-मका धान्य खरेदी केंद्र सुरू करण्याचा शुक्रवारी मुहूर्त गवसला असलातरी शुभारंभालाच बारदान नसल्याने धान्याअभावीच काटापूजन उरकण्यात आल्याने शेतकर्‍यांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. धान्य खरेदीसाठी आतापर्यंत सुमारे तीनशेवर शेतकर्‍यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे मात्र सुरुवातीला गोदामाची अडचण व त्यानंतर खरेदीला मुहूर्त गवसला असलातरी आता धान्य ठेवण्यासाठी बारदान नसल्याने पुन्हा खरेदीला ब्रेक लागण्याची भीती आहे. शेतकर्‍यांविषयी शासनाने एकूणच चालवलेल्या थट्टेने शेतकर्‍यांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून किमान एक महिना खरेदी केंद्राला मुदत वाढवून देण्याची मागणी होत आहे.

खरेदी केंद्राला सतराशे साठ विघ्न
महसूल विभागाच्या शासकीय गोदामात रावेर लोकसभा निवडणुकीचे ईव्हीएम व व्हीहीपॅट ठेवण्यात आल्याने भुसावळ तालुक्यात ज्वारी व मका खरेदी केंद्र सुरू होण्यास विलंब झाला. या दरम्यान 300 शेतकर्‍यांनी खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीही केली मात्र तरीही केंद्र सुरू होत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी रेटा वाढल्यानंतर महसूल विभागाने यानंतर चोरवड गावाजवळ एक खासगी गोदाम भाडेतत्वावर घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली तर शुक्रवारी आमदार संजय सावकारे, पणन महामंडळाचे अ‍ॅड.रवींद्र पाटील, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, तालुका शेतकरी संघाचे सभापती पंढरीनाथ पाटील आदींच्या उपस्थित काटापूजन करण्यात आले मात्र काटापूजनाला धान्य असूनही केवळ बारदान नसल्याने धान्याविनाच खरेदी केंद्र सुरू करण्याची नामुष्की ओढण्यात आल्याने संताप व्यक्त करण्यात आला.

सोमवारपर्यंत बारदान येण्याची शक्यता
बारदान येण्यासाठी अजून किमान दोन दिवसांचा वेळ लागणार असल्याने सोमवारपासूनधान्य खरेदीला सुरवात होईल, अशी शक्यता आहे. धान्य खरेदीसाठी शासनाने केवळ 31 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. भुसावळ तालुक्यात ज्वारी व मक्यासाठी तब्बल 310 शेतकर्‍यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. या शेतकर्‍यांचे धान्य खरेदीसाठी किमान 60 दिवस लागतील. यामुळे 31 डिसेंबरपर्यंत धान्य मोजणी होणार कशी? दहा ते 15 दिवसांची मुदतवाढ मिळूनही मोजणी पूर्ण होणार नसल्याची स्थिती निर्माण झाली असून किमान महिनाभरा मुदतवाढ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.