मुंबई:- शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याशिवाय आता सरकारसमोर पर्याय नाही. आम्ही उद्दिष्टाच्या जवळ असून आता थापा नको तर एका ओळीत ठराव मांडा अन्यथा कामकाज होऊ देणार नसल्याची आक्रमक भूमिका विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पत्रपरिषदेत मांडली. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखेपाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील, काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे उपस्थित होते.
सरकारच्या आश्वासनावर विश्वास नाही:- विखे-पाटील
शेतकरी कर्जमाफीपेक्षा सध्या तरी मोठा मुद्दा नाही. मार्च 2017 पूर्वी मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन सरकारने याआधी दिले होते. मात्र आता आम्हाला आश्वासन नको. सरकारच्या आश्वासनावर विश्वास राहिला नसल्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सभागृहात सुरुवातीला आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले. कर्जमाफीची घोषणा झाल्याशिवाय सभागृह कुठल्याही स्थितीत चालू देणार नसल्याचे विखे-पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी विखे पाटील यांनी बाबा आढाव यांच्या आंदोलनाचा दाखला देत शेतकऱ्यांना केवळ आश्वासनाच्या भूलथापा देत असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, ‘पुण्यात ज्यावेळी बाबा आढाव यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी आंदोलन केले होते त्यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी लेखी स्वरूपात मागण्या मान्य करून मार्च 2017 पूर्वी कर्जमाफीचे आश्वासन दिले असल्याचे विखे-पाटील यांनी सांगितले.
बँकांचा प्रॉब्लेम असेल तर शेतकऱ्यांच्या हातात पैसे द्या:- जयंत पाटील
सरकारची आर्थिक परिस्थिती प्रथमदर्शनी चांगली दिसत असून खर्चाची प्राथमिकता ही कष्टकरी वर्ग असणे आवश्यक आहे. कर्जमाफीसाठी सरकार आता बँकांचे कारण पुढे करत आहे. बँकांचा प्रॉब्लेम असेल तर शेतकऱ्यांच्या हातात पैसे द्यावेत अशी मागणी जयंत पाटील यांनी यावेळी केली. आम्हाला बँकेचे कौतुक नसून व्याजाची चर्चा न करता मुद्दल माफ करावे अशी मागणी त्यांनी केली. केंद्राचा मुद्दा आहे असं सांगत अर्थमंत्री मुनगंटीवार हे दिशाभूल करत असून उत्तरप्रदेशातील घोषणा ही त्यांच्या जाहिरनाम्यातील असल्याचे पाटील यांनी सांगितले. आता दिल्लीत चर्चा करू, केंद्रात जाऊ, तुम्ही आमच्यासोबत चला अशा थापा न देता एका ओळीत ठराव मांडण्याचे आवाहन त्यांनी केले.