चाकण : महाळुंगे येथील थायसन कंपनीमधून भरलेला आठ लाख रुपये किंमतीचा माल दिल्ली येथे न पोहोचवता परस्पर अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी ट्रक चालकावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ब्रिजपाल ग्यानचंद सिंग (वय 40, रा. ब्रुटीवाला खेडा, विकासनगर, देहरादून, उत्तराखंड) असे फसवणूक करणार्या ट्रक चालकाचे नाव आहे. याप्रकरणी बलराम बलवानसिंग भारद्वाज (वय 26, रा. स्वप्ननगरी, फ्लॅट नंबर 18, चाकण) याने फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, ब्रिजपाल याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
26 जुलैला निघाला होता ट्रक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थायसन क्रूप इलेव्हेटर इंडिया प्रा. लि. कंपनी, नवी दिल्ली या कंपनीच्या मालाची वाहतूक अभिलाषा लॉजिस्टिकमार्फत केली जाते. थायसन क्रूप कंपनीतील कच्चा माल हा महाळुंगे, (ता. खेड) येथील कंपनीतून तयार करण्यासाठी दिल्ली येथे पाठविण्यात येतो. 26 जुलै रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास अभिलाषा लॉजिस्टिकमधील ट्रक (एच.आर. 38, पी. 6756) मध्ये थायसन कंपनीमधून लिफ्टसाठी लागणारे एलिवेटर प्लेटचे 123 नग घेऊन ब्रिजपाल ग्यानचंद सिंग हा चालक दिल्ली येथे पोहोचविण्यासाठी निघाला होता. मात्र, त्याने आपला मोबाईल बंद करून ट्रकमधील 8 लाख 12 हजार 490 रुपये किंमतीच्या मालाचा अपहार करून फसवणूक केली. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.