शिरपूर: तालुक्यातील थाळनेर येथे किरकोळ घरगुती भांडणातून एकाने तापी नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना २९ मे रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. लक्ष्मण तुकाराम लोहार (वय ५५) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे आहे.
थाळनेर गावातील मयत लक्ष्मण तुकाराम लोहार याने घरगुती किरकोळ भांडणातून तापी नदीत उडी मारून आत्महत्या केली. याबाबत मयताचे साहित्य नदीकाठी मिळाल्याने आत्महत्या केल्याची खात्री झाली. थाळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांनी गावातील पट्टीचे पोहणारे मच्छिमार यांच्या सहकाऱ्याने एका तासात खोल पाण्यातून प्रेत काढण्यात यश मिळवले. यानंतर प्रेत शिरपूर येथील कॉटेज हॉस्पिटल येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. याबाबत थाळनेर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मयताच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, दोन मुली, जावई असा परिवार आहे.
दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे व मच्छीमारांच्या अथक प्रयत्नामुळे मयताचे प्रेत सापडले.