शिरपूर । तालुक्यातील थाळनेर येथे 13 वा व 14वा वित्त आयोगाच्या सन 2014-16 या कालावधीत एकूण 67 लाख 45 हजार 763 रूपयांचा निधी प्राप्त झाला होता, त्यापैकी 55 लाख 58 हजार 585 रूपयांचा अपहार झाल्याची तक्रार शिरपूर न्यायालयात दाखल करण्यात आली होती. चौकशीअंती न्यायालयाने दिनांक 5 रोजी पोलीसांना तत्कालीन सरपंच, बीडीओंसह 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आदेश दिले होते. दरम्यान, 4 दिवसानंतर दिनांक 9 रोजी थाळनेर पोलीसात त्या 8 ही आरोपींच्या विरोधात अपहाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत थाळनेर येथील कुबेरसिंग जयपालसिंग जमादार यांनी अपहारप्रकरणी शिरपूर न्यायालयात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत, तत्कालीन सरपंच म्हणून अरूणाबाई एकनाथ जमादार या 2012 ते 2017 या कालावधीत कार्यरत होत्या. त्यांनी तेरावा वित्त आयोग निधी अंतर्गत आर्थिक वर्ष 2014-15 या कालावधीत थाळनेर ग्रामपंचायतीस अनुदान 20 लाख 98 हजार 438, सन 2015-16 या कालावधीत 19 लाख 95 हजार 516 तर चौदावा वित्त आयोग अंतर्गत 2015-16 मध्ये 26 लाख 51 हजार 809 असा एकूण 67 लाख 45 हजार 763 रूपयांचा निधी प्राप्त झाला होता.
विनाचौकशी अहवाल सादर
वास्तविक थाळनेर ग्रामपंचायतीमार्फेत अशा प्रकारचा कोणाताही खर्च झालेला नसून रक्कम हडप केली आहे. याबाबत 8 ऑगस्ट 2017 रोजी बीडीओ यांच्याकडे झालेला आर्थिक अपहार, केलेल्या खोट्या चुकीच्या व अपूर्ण नोंदी तसेच ग्रामपंचायतीच्या बँक खात्यातून धनादेशाद्वारे बेकायदेशीरपणे अदा केलेल्या रक्कमा व ग्रामपंचायत मालकीच्या जमिनी अनाधिकारी खाजगी इसमांच्या नावे केल्या आहेत. या संदर्भांत बीडीओंनी चौकशी करणे बंधनकारक असतांना त्यांनी महिंदळे यांची सहाय्यक चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली. मात्र, चौकशी न करता त्या संदर्भांतील अपूर्ण अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करून दोषींना वाचविण्याचा प्रयत्न केला आहे.
ग्रामपंचायत रोजकिर्दमध्ये खर्च
रस्त्यांसाठी 7 लाख 3 हजार 500, ग्रामपंचायत रंगकाम 1 लाख 35 हजार, ढापे टकाण्यासाठी 30 हजार 200, शौचालय 1 लाख 65 हजार, मुतारी दुरूस्ती 79 हजार, पथदिवे 75 हजार, टेलिफोन बील 3 हजार 737, क्राँक्रीट रस्ता 4 लाख 300, संरक्षण भींत 1 लाख 88 हजार, गटार दुरूस्ती 2 लाख 50 हजार, सार्वजनिक शौचालय दुरूस्ती 1 लाख 95 हजार, पेव्हर ब्लॉक2 लाख, पाणीपुरवठा दुरूस्ती 4 लाख 75 हजार, घंटागाडी 2 लाख 98 हजार तर ग्रामपंचायतीच्या रोजकिर्द खर्च 22 लाख 79 हजार 848 रूपये दर्शविलेला आहे.
तत्कालीन सरपंचच्या पती व दिराला काम
तत्कालीन सरपंच अरूणाबाई जमादार यांचे पती एकनाथ जमादार व दीर ईश्वर काशिनाथ जमादार यांना काही कंत्राटी कामे दिली होती. ग्रामपंचायती बाबतीत आलेल्या तक्रारींची सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याची जबाबादारी बीडीओ कोसोदे व महिंदळे यांची असतांना त्यांनी दोषी व्यक्ती व्यक्ती विरूध्द फौजदारी स्वरूपाची कार्यवाही होणार नाही अशी तजविज करून वरिष्ठानां 7 सप्टेंबर 2017 रोजी अहवाल पाठविला होता. यामुळे थाळनेरचे तत्कालीन सरपंच अरूणाबाई एकनाथ जमादार, एकनाथ काशिनाथ जमादार, दिनक आनंदा पाटील, ग्रामविकास अधिकारी जी. के. वेताळे, ग्रामविकास अधिकारी शिवाजी एम. पवार, ग्रामविकास अधिकारी ए. आर. बोरसे, गटविकास अधिकारी भरत कोसोदे, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी आर. डी. महिंदळे असे 8 जणांविरोधात कोर्टांत तक्रार दाखल करण्यात आली होती. फिर्यादीकडून अॅड. अमित जैन यांनी काम पाहिले. 5 मे रोजी या संदर्भांत कोर्टात कामकाज होवून न्यायमुर्ती बी. सी. मोरे यांनी वरील आठही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, बुधवार 9 मे रोजी थाळनेर पोलीस ठाण्यात आठही आरोपीविरूध्द अपहाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
खोटे दस्ताऐवज केला तयार
तत्कालीन सरपंच अरूणाबाई जमादार, एकनाथ जमादार, दिनकर पाटील, ग्रामविकास अधिकारी वेताळे, एस. एन. पवार, ए. आर. बोरसे 6 जणांनी आपसात कटकारस्थान रचून, खोटे दस्ताऐवज तयार करून, ग्रामपंचायतीच्या दप्तरात झालेल्या खर्चाचे मंजूर अंदाजपत्रक, कामाची मोजमाप पुस्तिका, कामाचे मुल्यांकन दाखल, खर्चाची प्रमाणके यांची दिशाभूल करणार्या नोंदी करून 55 लाख 58 हजार 585 रूपयांचा अपहार केला