मनपा परिसरात थुंकणार्या तरुणास उपायुक्तांनी दिली शिक्षा
जळगाव- मनपात गेल्या चार दिवसांपूर्वी गुटखा खाणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे कर्मचार्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी एक तरुण मनपा इमारतीच्या परिसरात थुंकत असल्याचे उपायुक्त अजित मुठे यांनी पाहिले. त्यामुळे त्यांनी संबंधित तरुणास ’ तु थुंकलास,चल स्वच्छ कर ’ अशी ताकीद देवून थुंकलेल्या जागी पाण्याने स्वच्छ पुसून काढण्याची शिक्षा दिली तसेच शंभर रुपये दंडात्मक कारवाई देखील केली.
सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास किंवा थुंकण्यास मनाई असून दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. मात्र त्याची अंंमलबजावणी होतांना दिसून येत नाही. त्यामुळे सार्वजनिक छिकाणी सर्रासपणे धुम्रपान केले जाते. पान- तंबाखू खाऊन कुठेही थुंकून अस्वच्छता केली जाते. जळगाव महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये ठिकठिकाणी हा प्रकार दिसून येत आहे. त्यामुळे चार दिवसापूर्वी महापौर भारती सोनवणे,स्थायी समिती सभापती अॅड.शुचिता हाडा,उपायुक्त अजित मुठे यांनी मनपाच्या मुख्यप्रवेशद्वाराजवळ उभे राहून कर्मचार्यांची झाडाझडती घेतली असता गुटखा आढळून आलेल्या 12 कर्मचार्यांवर दंडात्मक कारवाई केली होती.या कारवाईमुळे कर्मचार्यांमध्ये जरब बसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान,आज शुक्रवारी सकाळी उपायुक्त अजित मुठे, स्थायी समिती सभापती अॅड.शुचिता हाडा आणि काही आरोग्य विभागाचे कर्मचारी मनपा प्रांगणात उभे होते. त्याचवेळी एक तरुण काही कामानिमित्त मनपात आला असता तो थुंकताना दिसला. त्यामुळे उपायुक्त अजित मुठे यांनी त्या तरुणाला थुंकलेल्या ठिकाणची जागा पाण्याने स्वच्छ करण्याची शिक्षा सुनावली. उपायुक्तांनी तरुणाला सुनावलेल्या शिक्षेमुळे मनपात चर्चा रंगत होती.