डोंबिवली । थॅलेासीमिया जागरूकता अभियानासाठी डोंबिवली प्राइड रन मॅरेथॉन रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट आणि कल्याण डोंबिवली रनर्स या संस्थाच्या माध्यमाने रविवारी रन फॉर थॅलेसेमिया प्रीव्हेंशन मॅरेथॉन पार पडली. यावेळी 1200 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. रोटरी इंटरनॅशनलच्या अधिपत्याखाली हजारो रोटरी क्लबनी मिळून गेल्या काही वर्षात पोलिओसारख्या मानवाला हतबल करणार्या विकाराला देशातून हद्दपार करण्यात यश मिळवले. आता यापुढे काही नागरिकांच्या गुणसूत्रातील जन्मजात वैग्युण्यामुळे आनुवंशिकतेतून पुढे जाणार्या थॅलेसेमिया या रक्तविकाराला आटोक्यात आणण्याचा चंग रोटरी परिवाराने बांधला आहे. त्याच उद्दिष्टाने थॅलेसेमिया प्रीव्हेंशन मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ह.भ.प. सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुल येथून संपन्न झालेल्या 5 कि.मी. व 10 कि.मी. अशा दोन स्तरावरील मॅरेथॉन स्पर्धेच्या उद्घाटनाला आमदार रवींद्र चव्हाण व रोटरीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते तर बक्षिस समारंभाला शिवसेनेचे रमेश सुकर्या म्हात्रे उपस्थित होते.
थॅलेसेमिया प्रीव्हेंशन मोहीम यंदाचा थ्रस्ट एरिया असल्याचं रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर बी.शिवराज यांनी ठिकठिकाणच्या उपक्रमांमध्ये स्पष्ट केले आहे. थॅलेसेमिया या विकाराबद्दल वेगवेगळ्या पातळ्यांवर जागरूकता निर्माण करणे आणि बाधित रुग्णाला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक दिलासा देणे हे आमचे उद्दिष्ट असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष दीपक काळे यांनी दिली. काही वर्षांच्या कालावधीत थॅलेसीमिया या विकाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृतीची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.
ज्ञानेश्वर मोरगा विजेता
डोंबिवली प्राइड धावण्याच्या स्पर्धेत ज्ञानेश्वर मोरगाने 10कि.मी हे अंतर 33.06 मिनिटांत पूर्ण करून पहीला नंबर पटकावला व उदेसिंग पाडवीने हेच अंतर 34.09 मिनिटांत पूर्ण करून दुसरा नंबर पटकावला तर महिलांमध्ये कविता भोईर ने हे अंतर 44 मिनिटांत पूर्ण करून पहिला नंबर पटकावला तिघेही विक्रमगड येथून येऊन वनवासी कल्याण आश्रमाचे प्रतिनिधित्व करत होते. तब्बल 1200 स्पर्धकांच्या सहभागाने रंगलेल्या या मॅरेथॉनचे संयोजन रनबर्न या संस्थेने केले होते. 10 किमी अंतरासाठी 577 आणि 5 कि.मी.साठी 723 स्त्रीपुरुष या स्पर्धेत उतरले होते.
स्पर्धेतील अन्य निकाल
खुला गट 10 कि.मी. पुरुष :
1. ज्ञानेश्वर मोरगा (33.09 मि), 2.उदेसिंग पगली (34.06 मि), 3. जगदीश गावडे (36.44 मि )
महिला :
1. कविता भोईर (44.18 मि), 2. दिव्या पडवी ( 46.59 मि), 3. पूजा पडवी ( 47.46 मि)
45 वर्षांवरील गट :
पुरुष : 1. उपेंद्र प्रभू, 2. अशोक भारोवा, 3. दीपक सोनी. महिला : 1. सुनिता टिक्कू, 2. मृणाल कुलकर्णी, 3. शकुंतला वाघ