थॅलेसेमियाग्रस्त बालकांच्या दिव्यांग प्रमाणपत्रासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे!

0

जळगाव । 8 मे हा जागतिक थॅलेसेमिया दिवस संपूर्ण जगभरात साजरा होत आहे. यानिमित्त थॅलेसेमिया ग्रस्त बालकांना दिव्यांग श्रेणीतून मिळणार्‍या प्रमाणपत्राकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून विनंती करण्यात आली आहे. त्यासोबत महाराष्ट्राचे आरोग्य सचिव मनोहर ठोंबरे यांना देखील विनंतीचे पत्र पाठविण्यात आले आहे. याकामी महाराष्ट्रात रक्तदान चळवळ सक्रीय करणार्‍या अवर ब्लड ग्रुपचे निर्माता कृणाल महाजन आणि सहकार्‍यांनी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांना देखील पत्र देवून मध्यस्ती करण्याविषयी विनंती केली आहे. यावेळी अवर ब्लड ग्रुपचे सदस्य दीपक जोशी, आनंद जोशी, ज्ञानेश्‍वर पाटील, हेमंत महाजन आणि माधवराव गोळवलकर रक्तपेढीचे व्यवस्थापक जितेंद्र शाह यांचे सहकार्य लाभले.

जीवन जगण्यासाठी सुमारे 1400 च्या वर रक्तपिशव्यांची पडते गरज
रक्तदानाच्या बाबतीत संपूर्ण भारतात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो. ही निश्‍चितच अभिमानाची बाब आहे. मात्र ‘थॅलेसेमिया मेजर’ हा रक्ताशी संबंधित आजार अतिशय गुंतागुंतीचा आणि जिकरीचा आहे. महाराष्ट्रात जवळपास 18,000 इतकी या आजाराने ग्रस्त मुलांची संख्या आहे. यात एक थॅलेसेमिया ग्रस्त बालकाला जीवन जगण्यासाठी सुमारे 1400 च्या वर रक्तपिशव्यांची गरज पडते. प्रत्येक महिन्यात खर्चिक रक्ताची तपासणी, महागड्या औषधी, मुलांना शारीरिक वेदना तसेच संपूर्ण परिवाराचे मानसिक खच्चीकरण आदी समस्यांमधून थॅलेसेमिया ग्रस्त बालक आणि संपूर्ण परिवार आपले जीवन कंठत आहे. जळगाव जिल्ह्यातील ‘अवर ब्लड ग्रुप’ हा स्वयंसेवी कार्यकर्त्यांचा ग्रुप महाराष्ट्रात रक्तदान चळवळ सक्रीय ठेवून रक्तदान जनजगृतीचे विविध उपक्रम घेत असतो. आता त्यापुढे जाऊन महाराष्ट्रातील थॅलेसेमिया ग्रस्त बालकांसाठी आणि त्यांच्या परिवारासाठी ‘सेवा’ देण्याचे ठरविले आहे. आम्ही या आजाराबाबत जनजागृती सुरु केली आहे.

अध्रादेशाला दोन वर्षे उलटली थॅलेसेमिया हा आजार केंद्र शासनाच्या ‘सामाजिक न्याय आणि अधिकारी मंत्रालयाने अपंग श्रेणीतून प्रमाणपत्र उपलब्ध व्हावे असे अध्यादेश जाहीर करून दोन वर्ष उलटली आहे. मात्र महाराष्ट्र शासनाने असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही. या मुलांना असे प्रमाणपत्र मिळाल्यास त्यांना शिक्षणास गती, शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळेल शिवाय प्रवास भाड्यात सवलती मिळतील. जेणे करून जीवनावश्यक औषधीकरिता तरतूद करता येईल. म्हणून या दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्र्यांसह, आरोग्य सचिव, जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री आदींना थॅलेसेमिया ग्रस्त बालकांची जाणीव करून देणारे पत्र पाठविण्यात आले आहे.