माजी आमदार शिरीष चौधरी यांनी पत्रकार परीषदेत लगावला टोला ; श्रेय लाटण्याला आमचा जाहीर निषेध
फैजपूर- रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीभाऊ माधव जावळे यांनी त्यांच्या ‘सुमन माधव फाऊंडेशनच्या वतीने ‘थेंब अमृताचा-जलसंधारणातून जलक्रांती’ हा कार्यक्रम हाती घेण्याची घोषणा केली आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ 2 मे 2019 रोजी झाला मात्र ‘थेंब अमृताचा जलक्रांती’ हे काम एकटे सुमन फाऊंडेशन करते आहे की लोकसहभागातुन होत आहे? असा सवाल करीत हा कार्यक्रम लोकसहभागातून होत असल्याने याचे श्रेय आमदार हरीभाऊ जावळे घेत असल्याने आमचा श्रेय लाटण्याला निषेध असल्याचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी येथे सांगितले. फैजपूर येथील मधुकरराव चौधरी फार्मसी महाविद्यालयात झालेल्या पत्रकार परीषदेत ते बोलत होते.
उपक्रमाचे स्वागत; तर आम्हीदेखील सहभागी होवू
गेली काही वर्षे रावेर-यावल परीसरात पुरेसा पाऊस न पडल्याने शेतकरी व शेती धोक्यात आली आहे त्यामुळे जलसंधारणाची कामे होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यादृष्टीने संतांच्या आशीर्वादासह आमदार जावळे यांनी हाती घेतलेल्या या कार्यक्रमाचे आम्ही स्वागत करतो व त्यांची तयारी असेल तर त्यात आम्ही सहभागी ही होवू कारण जनहिताच्या प्रत्येक कार्यात कुठलाही अभिनिवेश न ठेवता सहभाग घेण्यासाठी आम्हा यावल व रावेर तालुक्यातील कार्यकत्यांची आणि जनसामान्यांचीही तयारी असते,. अशी माहिती माजी आमदार शिरीष चौधरी यांनी पत्रकार परीषदेत पत्रकारांशी बोलताना दिली.
आमदारांचा श्रेय लाटण्याचा प्रयत्न
पुढे म्हणाले की, गत दोन-तीन वर्षांपासून यावल-रावेर परीसरातील अनेक गावांतील लोक स्वयंस्फूर्तीने जलसंधारणाची कामे करीत आहेत. हरीपुरा, कोरपावली, वड्री, परसाळे, कोळवद, कठोरा, सांगवी, बोरखेड़ा, मारूळ, न्हावी, खिरोदा, चिंचाटी, जानोरी, सावखेडा, लोहारा, कुसुंबा, आभोडा, मुंजलवाडी, के-हाळे, मंगरुळ, अहिरवाडी, पाल, मोहमांडली, निंभोरा अशा अनेक गावांत स्थानिक शेतकर्यांनी नाला खोलीकरण, नदीपात्रात बांध घालणे, नदी पात्र नांगरणे, चर खोदणे अशी कामे केलेलीच आहेत. तेच काम आता आमदार करू पाहत आहेत. त्यामुळे त्यांच्या हेतूबद्दल संशय वाटतो व झालेल्या कामाचे श्रेय घेण्याचा त्यांचा हेतू आहे असे दिसून येते. याला कारण असे की, गेली साडेचार वर्षे आमदारांनी या संदर्भात लोकप्रतिनिधी या नात्याने काहीपावले उचलली आहेत का? व विधानसभेत त्याबाबत चर्चा केली आहे का? तसे केले असल्यास सरकारकडून काय प्रतिसाद मिळाला हे त्यांनी सांगावे. आता विधानसभा निवडणूक जवळ आल्यामळे परीस्थितीचा राजकीय लाभ उचलण्यासाठी त्यांची धडपड आहे, असे जाणवते. कारण ते सत्ताधारी आमदार आहेत.
वाढदिवसाचे गिप्ट अद्यापही फळाला नाही
चौधरी पुढे म्हणाले की, आमदार जावळे यांनी पाण्याची परीरस्थिती पाहता शासकीय यंत्रणा कार्यान्वित करून जलसंधारणासाठी शासनाकडून निधी मंजूर करुन आणायला पाहिजे होता, त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करायला पाहिजे होता. आमदार जावळे यांच्या वाढदिवसाप्रसंगी तीन वर्षापूर्वी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी आवेशपुर्ण उत्साहात शेळगाव बॅरेजचे काम पुढच्या डिसेंबर पर्यंत (डिसेंबर 2017) पुर्ण होऊन शेळगाव बॅरेजमध्ये पाणी थांबेल, असे सांगून आमदारांना वाढदिवसाचे गिफ्ट दिले होते पण ते गिफ्ट तीन वर्ष पुर्ण झाले तरीही फळाला आलेले नाही. हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत. तसे काहीही न करता हरीभाऊ फक्त फ्लड कॅनालबद्दलच बोलत राहिले. फ्लड कॅनॉल योजनेची गरज आहेच पण ती हजारो कोटींची योजना असल्याने त्यासाठी निधी उपलब्ध होण्यासाठी व ती योजना कार्यान्वित व्हायला खूप अवधी लागणार आहे. तसेच फ्लड कॅनाल हा विषय निवडणुका जवळ आल्यावरच चर्चिला जातो नंतर बासनात गुंडाळला जातो. गरज आहे ती गावपातळीवर जलसंधारणाची कामे तातडीने होण्याची, त्याकडे आमदारांनी आजपर्यंत किती लक्ष दिले? किती निधी सरकारकडून आणला याचा हिशोब
देण्याची गरज आहे. यावल तालुक्यातील नागादेवी तलावाच्या कामासाठी अखेर 93 वर्ष वयाच्या वयोवृध्द शेतकरी व इतर शेतकर्यांना चार दिवस उपोषण करण्याची वेळ आली तोपर्यंत आमदार स्वस्थ बसून होते. मतदारसंघातील पाझर तलावांची दुरुस्ती, गाळ काढणे अशी कामे अग्रक्रमाने घ्यायला पाहिजे होती पण ती झालेली नाहीत. ती का झाली नाहीत? जलसंधारणासाठी संबंधित गाव लोक व अधिकारी यांच्या किती बैठका गेल्या चार वर्षात झाल्या ? याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. ज्या गावांनी आतापर्यंत स्वयंस्फूर्तीने जलसंधारण चळवळ राबविली त्या सर्व गावांतील संबंधित लोकांना सोबत घेऊन, त्यांच्याशी विचार विनिमय करून थेंब अमृताचा हा कार्यक्रम निश्चित केला असता तर विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असते, पण त्यांनी तसे केले नाही त्याउलट ते फक्त स्वतःच्या फाऊंडेशन मार्फत जलसंधारण करण्याची घोषणा करुन यापूर्वी गावोगाव झालेल्या कामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत की काय घ अशी शंका निर्माण होण्यास वाव आहे. किंवा हे जनतेचा विश्वास आणि आत्मविश्वास गमावल्याचे लक्षण आहे.
श्रेय लाटण्याच्या केविलवाण्या धडपडीचा निषेध
आमचा विरोध जलसंधारण कामाला नाही कारण ते समाजहिताचे काम आहे, श्रेय लाटण्याच्या केविलवाण्या धडपडीचा मात्र आम्ही निषेध करतो. सर्वसामान्य माणूस आता दुधखुळा न राहता जागृत झालेला आहे. त्याला मुर्ख बनविणे शक्य नाही, त्यामुळे आमदारांनी तसा प्रयत्न करुन नये. उलटपक्षी सर्वांना विश्वासात घेवून, शासकीय निधी मिळवून जलसंधारण कामाला गती देण्याची गरज आहे. त्यात आम्हीही सहभागी होण्यास तयार आहोत.
यांची पत्रकार परीषदेला उपस्थिती
मसाका चेअरमन शरद महाजन, काँग्रेस यावल तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस रावेर तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, रावेरचचे पंचायत समिती सदस्य रावेर योगेश पाटील, यावलचे शेखर पाटील, रावेर कृ.उ.बा. सभापती राजीव पाटील, माजी उपनगराध्यक्ष केतन किरंगे व यावल-रावेर तालुक्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रेय घेणार नाही हा तर शेतकर्यांचा उपक्रम -आमदार जावळे
आमदार हरीभाऊ जावळे कधीच कोणत्याच कामांचे श्रेय घेत नाही आणि घेणारही नाही. ‘थेंब अमृताचा जलसंधारणातून जलक्रांती उपक्रम’ हा माझ्या एकट्याचा नसून पूर्ण शेतकर्यांचा आहे. आपल्या भागातील संत-महंतांनी या उपक्रमात सहभाग घेतल्याने सुमन फाऊंडेशन हे नाव तेव्हाच वळगण्यात आले आहे. मी फक्त समन्वयाचे काम करीत आहे. यावर्षी भीषण दुष्काळ असल्याने केळीबागा पूर्णपणे जळाल्या आहेत. येणार्या काळात दुष्काळाची झळ लागू नये म्हणून थेंब अमृताचा जलक्रांती हा उपक्रम राजकारणाविरहित होत आहे. यात संत-महंत, शेतकरी, संस्था, शैक्षणिक संस्था सर्व राजकीय लोक यात सहभाग घेत आहे. मला कुठलाही राजकीय वारसा नसल्याने मला जितके काम करता येते तेव्हडे मी करतो. कोणी मला शिव्यादेखील दिल्या तरी मी माझे काम करत राहील यावर जास्त मला बोलायाचे नाही. शेळगाव बॅरेज हा प्रकल्प कुणाच्या काळात 15 वर्ष बंद होता ते आधी बघावे, भाजप सरकार आल्याने 700 कोटी रुपये मंजूर करून आज शेळगाव बॅरेजच काम सुरू असल्याचे आमदार हरीभाऊ जावळे यांनी सांगितले.