साखर सहसंचालकांनी दिले आदेश
पुणे : थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या अवसायकपदी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे सहायक व्यवस्थापक पी. बी. देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रादेशिक सहसंचालक (साखर) संजयकुमार भोसले यांनी पी. बी. देशमुख यांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहेत. या पुर्वी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव बी. जे. देशमुख यांच्याकडे अवसायकाची जबाबदारी होती.
यशवंत सहकारी कारखान्याचा संचित तोटा १३८ कोटी ४ लाख ७८ हजार रुपये इतका आहे. कारखाना २०११ पासून बंद आहे. कारखाना सुरु करण्यासाठी निधी उपलब्ध करण्याचे प्रयत्न करुनही त्यात यश आले नाही. राज्य बँकेचे सर्वाधिक ४४ कोटी ५३ लाख ७८ हजार रुपयांचे कर्ज थकीत आहे. या कर्जाच्या वसुलीसाठी कारखान्याची ११७ एकर जमीन विक्रीची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून, त्यास अजूनही प्रतिसाद मिळालेला नाही. बँकेचे थकीत कर्ज मोठ्या प्रमाणावर असून, त्यासाठी अनुत्पादक खात्याची (एनपीए) तरतूद राज्य बँकेस करावी लागली आहे. बँकेची कर्जवसुली सुलभरित्या होण्यासाठी बँकेच्या अधिकाऱ्याची कारखान्यावर नियुक्ती होणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर बँकेच्या अधिकाऱ्याची अवसायक म्हणून नियुक्ती करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.