चिंचवडमधील सहा बांधकामांवर हातोडा
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत बांधकामे व नियंत्रण विभागाने थेरगाव आणि चिंचवड येथील अनधिकृत बांधकामे भुईसपाट केली असून, थेरगावातील 5 हजार 292 चौरस फुट अनधिकृत बांधकामावर आणि चिंचवड येथील सहा बांधकामांवर हातोडा चालविण्यात आला आहे. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता.
कडेकोट पोलिस बंदोबस्तात महापालिकेची कारवाई
ग क्षेत्रीय कार्यालयांतर्गत थेरगाव येथील चालू असलेल्या आरसीसी अनधिकृत बांधकामावर हातोडा चालविण्यात आला. 5292 चौरस फुट अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. ही कारवाई दोन जेसीबी, एक ट्रॅक्टर, एक ट्रक, 15 मजूर, 15 पालिकेचे कर्मचारी यांच्या सहाय्याने करण्यात आली. ब क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग चिंचवड येथे चालू असलेले अनधिकृत पत्राशेड व आरसीसी बांधकामावर कारवाई करण्यात आली. या कारवाईत चिंचवड येथील एक वीटबांधकाम, दोन आरसीसी आणि तीन पत्राशेड असे एकूण सहा बांधकामावर (1 हजार 572 चौरस फुट क्षेत्रफळ) कारवाई करण्यात आली. कार्यकारी अभियंता मकरंद निकम, यांचे मार्गदर्शनाखाली उपअभियंता केशवकुमार फुटाणे व इतर कनिष्ठ अभियंता, बीट निरीक्षक यांचे पथकाने ही कारवाई केली. यावेळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनीही अत्यंत कडेकोट बंदोबस्त दिला होता.