बाकी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस हा विधानसभेच्या माजी सदस्यांना श्रद्धांजलीच्या कार्यक्रमासह संपला. यात विदर्भविर जांबुवंतराव धोटे यांच्याविषयी सभागृहात चर्चा चालत असताना त्यांच्या ‘पेपरवेट’ प्रकरणावरून काही काळ हशा देखील पिकला. पहिल्या दिवशी ‘मुंबईचा महापौर’ या विषयावर अधिक चर्चा रंगून आली होती. राज्याच्या एकूणच राजकारणात सध्या महत्वाचा मानला जात असलेला मुंबईच्या महापौरपदाचा विषय काही प्रतिनिधी गुपचूप तर काही उघडपणे बोलत होते. काहींच्या मते हा मुख्यमंत्र्यांचा मास्टर स्ट्रोक आहे तर काहींच्या मते मुख्यमंत्र्यांची आपले पद वाचविण्यासाठी महापौर पद ‘सॅक्रिफाईज’ केले. तर काहीजण सेनेच्या आणि उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित करत होते. तूर्तास महापौर पद सेनेला मिळाल्याने सेनेच्या मंत्र्यांचे मंत्रिपद अजून काहीकाळ सुरक्षित झाल्याची भावना देखील काहीजण बोलून दाखवत आहेत. बाय द वे, उद्धव ठाकरे यांनी या उपलब्धीसाठी मुस्लिम बांधवांचे आभार मानले ही गोष्ट विशेष म्हणावी लागेल. प्रचंड त्रास सोसत कृषिप्रधान संस्कृती टिकवून ठेवणारा बळीराजा अर्थात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी काहीतरी वेळ का होईना विरोधकांनी दांगडो करून कृषक समुदायाप्रति आपली सहानुभूती दाखवून दिली. जवानांच्या प्रति वादग्रस्त बरळनारे पंढरपूरच्या प्रशांत परिचारकांना चांगलेच धारेवर धरले गेले. माफी मागितल्यावर सुद्धा त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीने सभागृह दणाणून सोडले. शेतकरी आणि जवान यांच्याप्रति दाखवलेल्या या प्रेमानंतर ‘जय जवान-जय किसान’ची आठवण आल्याशिवाय राहिली नाही. याही पुढे विधानपरिषदेत सर्व सदस्यांना हायब्रीड टॅब देऊन अटलजींच्या स्वप्नातील ‘जय जवान-जय किसान-जय विज्ञान’ ही घोषणा पूर्ण झाल्याचे समाधान सत्ताधाऱ्यांच्या मुखावर दिसत होते. आज टेक्नॉलॉजीच्या दुनियेत अशा उपकरणांची गरज असताना केवळ टॅबवर इंग्रजी भाषा दिसली म्हणून विरोध करणारे विरोधक जरी तोकडा विरोध करत असले तरी या निर्णयाची अमलबजावणी व्यवस्थित होणे आवश्यक आहे.
आता कुणाचं काय चुकलंय आणि कुणाचं काय बरोबर आहे हे येणारा काळ ठरविणार आहे. सध्या मुंबई उष्णतेच्या दृष्टीने फार गरम असल्याचे वाटत आहे अर्थात उष्णता प्रचंड वाढली आहे याच गरमागरमीत राजकीय उष्णतेची लाट किती तापमान वाढवतेय याकडे आता लक्ष आहे.
निलेश झालटे – 9822721292