मुंबई | राज्याच्या वाड्यावस्त्यांवरील राजकारण ढवळून काढणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सदस्यांमधून सरपंच निवडण्याऐवजी थेट मतदारांतून सरपंच निवडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरी सरपंचपदासाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराला मुक्त चिन्ह घेऊनच निवडणूक लढवावी लागणार आहे. या उमेदवारांना भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस यासह राजकीय पक्षांसाठी राखीव असलेले चिन्ह घेता येणार नाही. त्यामुळे गावाच्या राजकारणात राजकीय पक्षांना अजिबात स्थान असणार नाही.
ऑक्टोबर 2017 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीत राज्यातल्या चार हजार 120 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. ऑक्टोबरमध्ये राज्यातल्या 13जिल्ह्यांमधील 117 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. या निवडणुकांपासूनच जनतेतून सरपंच निवडण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे. जनतेतून सरपंच निवडण्यासाठी आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या निवडीसाठी राज्य निवडणूक आयोगाची तयारी अंतीम टप्प्यात आली आहे. जनतेतून निवडल्या जाणाऱ्या सरपंचाबाबत असलेले संभ्रम दूर करण्यात आले
आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वप्रथम सरपंचपदाच्या उमेदवारांना मुक्त चिन्हांच्या यादीतील चिन्हांचे वाटप होणार आहे. सरपंचपदाच्या उमेदवाराला वाटप करण्यात आलेली मुक्त चिन्हे गोठविण्यात येणार असून त्या गावातील प्रभागातील उमेदवारांना ते चिन्ह मिळणार नाही. त्यामुळे आता गावात सरपंचाचे चिन्ह वेगळे आणि ग्रामपंचायत सदस्याची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे चिन्ह वेगळे असणार आहे. सरपंचपदाच्या उमेदवारांना वाटप झालेल्या चिन्हानंतर शिल्लक राहिलेली चिन्हे ग्रामपंचायत सदस्यपदाच्या उमेदवारांना
वाटप केली जाणार आहेत, असे कळते.