थेरगांव सोशल फाऊंडेशनचा उपक्रम
चिंचवड : थेरगांव सोशल फाऊंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे दर रविवारी ‘खिळे मुक्त झाडे’, ‘पेन फ्री ट्री’ हा अनोखा उपक्रम राबविला जात आहे. आज, रविवारी राघवेंद्र स्वामी मठ रस्त्यावरील सुमारे चाळीस झाडांना खिळे आणि तारांच्या विळख्यातून मुक्त करण्यात आले. अनिकेत प्रभु, निलेश पिंगळे, अनिल घोडेकर, शुशांत पांडे, मनोज वंजारी, राहुल सरोदे, शशीकांत कात्रे, विक्रम शेळके, प्रकाश गायकवाड, राहुल जाधव, सचिन क्षीरसागर, मयूर कांबळे, दशरथ रणपिसे, रोहित ढोबळे, महेश येळवंडे, युवराज पाटील, निखिल माळी आदि तरूणांनी एकत्र येऊन थेरगांव सोशल फाऊंडेशन या संस्थेची निर्मिती केली आहे.
निसर्ग वाचविण्याची मोहिम
या उपक्रमात सहभागी असणारे बहुतेक सर्वजण नोकरी धंद्यात व्यस्त असल्याने दर रविवारी सकाळी ही तरूणाई एकत्र येते आणि मग सुरू होते निसर्गाला वाचविण्याची मोहीम. परिरातील एखादा रस्ता निवडून त्या रस्त्याच्या कडेला असणार्या झाडांना जाहिरात फलकांसाठी मारण्यात आलेले खिळे, पिना, बांधण्यात आलेल्या तारा अश्या झाडाच्या जीववर बेतणार्या गोष्टी काढून टाकून झाडालाही मुक्त श्वास घेता यावा यासाठी ही मंडळी प्रयत्न करीत आहेत. स्थानिक दुकानदारांचे प्रबोधन करून झाडांची काळजी घेण्यासाठी त्यांना प्रवृत्त करण्याचे काम ही मंडळी करीत आहेत.