पिंपरी-चिंचवड : थेरगाव येथील श्री फाउंडेशनच्या वतीने मोफत आरोग्य चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गीता विद्या निकेतन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये हे शिबिर घेण्यात आले होते. यावेळी डॉ. श्रीकांत कासार यांनी स्वाईन फ्लूची माहिती दिली. डॉ. अमित नेमाने यांनी दातांची स्वच्छता व त्यांचे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी शाळेचे प्राचार्य चंद्रकात बेल्हेकर, सरीता वायदंडे, सरीता पांडे, मदन जोशी, राजेंद्र काकडे, प्रशांत जाधव आदी उपस्थित होते.
विद्यार्थी, शिक्षकांचा सहभाग
स्वाईन फ्लू अभियानात 120 विद्यार्थी व 14 शिक्षकांनी या शिबिराचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजया उपासणे यांनी केले. श्री फाउंडेशनचे अध्यक्ष सुशांत पांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती निर्माण व्हावी, साथीचे आजार तसेच रोगराईच्या निराकरणासाठी काय प्रयत्न करावेत, याची माहिती नागरिकांना व्हावी, या उद्देशाने हे शिबिर घेण्यात आले. श्री फाउंडेशनच्या माध्यमातून असे अनेक सामाजिक उपक्रम नियमितपणे राबविले जातात, असेही सुशांत पांडे यांनी सांगितले.