पिंपरी (प्रतिनिधी) पिंपरी-चिंचवड महापालिकेला 2017-18 या आर्थिक वर्षामध्ये कर संकलन विभागाच्या थेरगाव कार्यालयातून तब्बल 99.73 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. थेरगाव परिसरात 84 हजार 704 मिळकती आहेत. महापालिकेला 2017-18 या आर्थिक वर्षातून शहरभरातून मालमत्ता करातून गेल्या दहा वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक 421.08 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. त्यामध्ये सर्वाधिक थेरगाव विभागीय कार्यालयातून महसूल प्राप्त झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात चार लाख 83 हजार 463 मिळकती आहेत. या मिळकतींना महापालिकेतर्फे कर आकारणी केली जाते.
* मिळकत कर भरण्यासाठी 16 ठिकाणी सोय
मिळकत भरण्यासाठी पालिकेने 16 ठिकाणी सोय उपलब्ध करुन दिली आहे. निगडी, आकुर्डी, चिंचवड, थेरगाव, सांगवी, पिंपरी वाघेरे, पिंपरीनगर, पालिका भवन, फुगेवाडी, भोसरी, चर्होली, मोशी, चिखली, तळवडे, किवळे आणि दिघी बोपखेल या ठिकाणी मिळकत कर भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. थेरगाव परिसरात मध्यमवर्गीय रहिवाशांचे अधिक वास्तव्य आहे. थेरगावात पालिकेच्या 84 हजार 704 मिळकती आहेत. या मिळकत धारकांकडून पालिकेला तब्बल 99.73 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. त्याखालोखाल सांगवी कार्यालयातून 43.44 कोटी, भोसरी 32.43 कोटी, पिंपरी वाघेरे 31.22 कोटी, चिंचवड 29.70 कोटी, आकुर्डी 27.52 कोटी, मनपाभवन 27.03 कोटी आणि चिखली परिसरातून 25.68 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.