थेरगाव परिसरात आणखी 7 वाहनांची तोडफोड

0

तिघांविरोधात गुन्हा दाखल

पिंपरी : पिंपरी-चिंचवड परिसरात वाहनांच्या तोडफोडीच्या घटना वारंवार घडत आहेत. काही दिवसांपूर्वीच पिंपरी, नेहरूनगर परिसरातील गाड्या फोडण्यात आल्या होत्या. आता थेरगाव परिसरात आणखी 7 वाहनांची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार बुधवारी (दि. 23) रात्री अकराच्या सुमारास थेरगाव परिसरात घडला. महेश मुरलीधर तारू (वय 43, रा. नम्रता हाऊसिंग सोसायटी, नखाते नगर, थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार करण शिंदे, चिक्या सूर्यवंशी, नवनाथ भातकुटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरील आरोपी बुधवारी रात्री अकराच्या सुमारास दुचाकीवरून (एम एच 14 / ए एफ 4601) आरडाओरडा करत आले. तिघेजण नम्रता हाऊसिंग सोसायटीमध्ये आले होते. त्यावेळी महेश यांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. या तिघांनी मिळून महेश यांना कोयत्याचा धाक दाखवून खिशातून एक हजार रुपये हिसकावून नेले. तिघांनी मिळून नम्रता हाऊसिंग सोसायटी आणि शिक्षक कॉलनी मधील 7 दुचाकी व चारचाकी वाहनांची तोडफोड केली. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलीस तपास करीत आहेत.