थेरेसा मे यांचा मध्यावधीचा डाव फसला

0

नवी दिल्ली । कर्जमाफीवरून शेतकर्‍यांनी छेडलेल्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात मध्यावधी निवडणुका होतील, असे भाकीत राजकीय पक्षांच्या नेत्यांनी वर्तवले आहे. ग्रेट ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांना मात्र देशात मध्यावधी निवडणुका घेण्याचा निर्णय चांगलाच महागात पडल्याचे शुक्रवारी जाहीर झालेल्या निकालांवरून स्पष्ट झाले आहे. ब्रिटनच्या संसदेतील 650 जागांपैकी पंतप्रधान मे यांच्या हुजूर पक्षास 315 जागा मिळाल्या आहेत, तर त्यांचा प्रमुखविरोधी पक्ष असलेल्या मजूर पक्षाला या निवडणुकीत फायदा मिळाला असून त्यांचे 261 उमेदवार या निवडणुकीत विजयी झाले आहेत. मात्र ब्रिटनच्या संसदेत बहुमतासाठी 326 हा जादूई आकडा असल्यामुळे तिथे आता त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. स्वत: पंतप्रधान थेरसा मे या दक्षिण-मध्य इंग्लंडमधील मेडनहेड मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. थेरेसा मे 37,780 मतांनी विजयी झाल्या आहेत. मात्र, संसदेतील बहुमत गमावले असल्यामुळे त्यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव आणला जात आहे.

विरोधी मजूर पक्षाचे नेते जेरमी कॉर्बिन यांनी थेरेसा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. कॉर्बिन म्हणाले की, राजकारण बदलेले आहे. निवडणुकीतील निकाल समाधानकारक आहेत. पंतप्रधानांना जनादेश पाहिजे होता म्हणून त्यांनी निवडणुका घेतल्या. आता त्यांनी बहुमत गमावले आहे हा जनादेशच आहे. कॉर्बिन यांनी ट्विट करून ब्रिटनच्या राजकारणाचा चेहरा बदलवला असल्याचे सांगितले होते. दरम्यान, थेरेसा मे यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे. थेरेसा मे म्हणाल्या की, निवडणुकीत अपेक्शेनुसार यश मिळाले नाही. सद्यपरिस्थितीत ब्रिटनला स्थिर सरकारची आवश्यकता आहे. त्रिशंकू परिस्थितीत मजूर आणि हुजूर या दोन्ही पक्शांच्या नेत्यांनी सत्ता स्थापन करण्यासाठी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे.

चौथी निवडणूक
गेल्या तीन वर्षांमध्ये ब्रिटनमध्ये झालेली ही चौथी निवडणुक होती. स्कॉटलंडच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटनमध्ये 2014 मध्ये सार्वमत घेण्यात आले होते. त्यानंतर 2015 मध्ये ब्रिटनमध्ये सर्वसाधारण निवडणुका झाल्या. 2016 मध्ये युरोपियन संघटनेतून बाहेर पडण्यासाठी ब्रेग्झिटच्या मुद्द्यावर मतदान झाले होते. आता झालेल्या निवडणुकीत एकुण 4.6 कोटी मतदार होते. त्यात सुमारे 15 लाख भारतीय वंशाच्या मतदारांचा समावेश होता.

पहिली शीख महिला खासदार
यंदाच्या निवडणुकीत ब्रिटनच्या संसदेत पहिल्या शीख महिला खासदाराची निवड झाली आहे. मजूर पक्षाच्या उमेदवार प्रीत कौर गिल यांनी विजय मिळवला. प्रीत कौर गिल यांनी बर्मिंगहॅम एडबॅस्टनची जागा 24 हजार 124 मते मिळवून जिंकली. सत्ताधारी हुजूर पक्षाच्या उमेदवार कॅरलिन स्क्वायर यांचा गिल यांनी 6 हजार 917 मतांनी पराभव केला.ज्या मतदारसंघात माझा जन्म झाला, मी लहानाची मोठी झाले, त्याच भागाचे खासदारपद भूषवण्याची संधी मिळाल्याने मी आनंदी झाले आहे. मेहनत आणि दृढनिश्‍चयाच्या बळावर मी कठीण गोष्टी साध्य करेन, असा विश्‍वास प्रीत कौर गिल यांनी विजयानंतर व्यक्त केला. तन्मनजीत सिंग देसी यांनी 34 हजार 170 मते मिळवत लेबर पक्षाचे पहिले पगडीधारी खासदार होण्याचा मान पटकवला आहे. लेबर पार्टीतर्फे 14 भारतीय वंशाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

एक्झिट पोल खरा ठरला
मतदानानंतर गुरुवारी रात्री घेण्यात आलेल्या एक्झिट पोलमध्ये ब्रिटनच्या संसदेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. एक्झिट पोलमध्ये थेरेसा मे यांच्या हुजूर पक्षाला 326 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. दोन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत हुजूर पक्षाने 331 जागा जिंकल्या होत्या. मजूर पक्शाला 232 जांगाऐवजी 266 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता.