थेरोळा शिवारात ऊस तोडणी कामगाराची आत्महत्या

मुक्ताईनगर : तालुक्यात थेरोळा शिवारात ऊस तोडणीसाठी आलेल्या वृद्ध मजुराने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. गोकुळ प्रभू पवार (55, उमरा) असे मयताचे नाव आहे. मुक्ताईनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येचे स्पष्ट कारण कळू शकले नाही.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
थेरोळा शिवारात मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड असून ऊस तोडणीसाठी मजुरांच्या टोळ्या आसपासच्या गावांसह इतर जिल्ह्यातून दाखल झाल्या आहेत. उमरा या गावातून गोकुळ प्रभू पवार हे वयोवृद्ध देखील कुटुंबासह आले होते. मंगळवारी गोकुळ हे कुर्‍हा येथून दुपारी बारा ते एकच्या दरम्यान आल्यानंतर त्यांनी भत्तऊराव बेलदार यांच्या शेता शेजारील वनहद्दीत असलेल्या टेकडीवर एका कडुनिंबाच्या झाडाला दोराच्या सहाय्याने गळफास घेतला. ही घटना समजताच थेरोळा येथील पोलिस पाटील समाधान भोंबे यांनी कुर्‍हा पोलिस चौकीला खबर दिली. हवालदार श्रावण जवरे, पोलिस शिपाई संजय लाटे, अरुण लोहार हे घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी मुक्ताईनगर येथे हलवण्यात आला. या प्रकरणी मयताचा मुलगा अनिल गोकुळ पवार याने दिलेल्या खबरीवरून मुक्ताईनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.