थोडक्यात वाचली श्रीलंका

0

कोलकाता । पावसाच्या व्यत्ययामुळे बाधित झालेला कोलकात्यातील श्रीलंकेविरुद्धचा पहिला कसोटी सामना रोमाचंक चढउतारानंतर अनिर्णीत अवस्थेत संपला. सामन्याच्या शेवटच्या भारतीय संघाने शानदार खेळ केला. कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद शतकामुळे (104) भारतीय संघाने आपला दुसरा डाव 8 बाद 352 धावांवर घोषीत केला. शिखर धवन आणि लोकेश राहुलनेही अर्धशतकी खेळी केल्या. सामना जिंकण्यासाठी श्रीलंकेला दुसर्‍या डावात 231 धावा करायच्या होत्या. हा सामना निरस अवस्थेत अनिर्णीत राहील असे एकवेळ वाटत होते. पण श्रीलंकेच्या दुसर्‍या डावाच्या सुरुवातीपासूनच भारतीय गोलंदाजांनी एकापाठोपाठ एक अशा विकेट्स मिळवायला सुरुवात केल्यावर विजयाची आस निर्माण झाली होती. पण वेळेचे बंधन भारताच्या विजयाच्या आड आले. 26.3 षटकानंतर पाहुण्यासंघाची 7 बाद 75 अशी बिकट अवस्था झाली असताना पंचानी अपुर्‍या प्रकाशाअभावी खेळ समाप्तीची घोषणा केल्यामुळे भारताला अनिर्णित निकालावर समाधान मानावे लागले. श्रीलंकेच्या दुसर्‍या डावात भवनेश्‍वरकुमारने भारतासाठी सर्वाधिक चार विकेट्स मिळवल्या.

मोहम्मद शमीने दोन आणि उमेश यादवला एक विकेट मिळाली. या सामन्यातील श्रीलंकेच्या 17 विकेट्स भारताच्या वेगवान गोलंदाजांनी मिळवल्या भुवनेश्‍वरकुमारने सवाधिक आठ, मोहम्मद शमीने सहा आणि उमेश यादवने तीन फलंदाज बाद केले. श्रीलंकेच्या मागील दौर्‍यात भारताने सर्व नऊ सामने जिंकले होते. पण कोलकाता कसोटीतील पहिले चार दिवस भारतीय संघ बॅकफुटवर होता. सामन्यातील पाचव्या आणि शेवटच्या दिवशी मात्र भारतीय संघाने सर्व फासे पालटले. दुसर्‍या डावात आणखी काही षटके मिळाली असती सामन्याचा निकाल भारताच्या बाजूने लागला जे निश्‍चित.

विराटची पन्नाशी
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने दमदार शतक झळकावले. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवरील या शतकासह विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 शतके पूर्ण केली आहेत. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत विराटने कसोटीत 18 तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 32 शतके झळकावली आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात षटकार ठोकत विराटने शतक पूर्ण केले. या सामन्यात विराटने 119 चेंडूत 12 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 104 धावांची खेळी केली. यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगला मागे टाकत भारतीय कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक एकदिवसीय शतकांच्या यादीत दुसरा क्रमांक पटकावला होता. रिकी पाँटिंगचा 30 शतकांचा विक्रम कोहलीने मुंबईच्या वानखेडे मैदानावर मोडला होता. विराटने आपल्या 200 व्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात हा विक्रम प्रस्थापित केला होता. एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतकांच्या यादीत विराट कोहलीच्या पुढे आता भारताचा सचिन तेंडुलकर हा एकमेव खेळाडू आहे.

चेतेश्‍वर पुजाराचा असाही विक्रम
कोलकाता कसोटीत भारतीय संघाचा संकटमोचक ठरलेल्या चेतेश्‍वर पुजाराने श्रीलंकेविरुद्धच्या या कसोटीत नवा विक्रम रचला आहे. ईडन गार्डन्सवर सुरु असलेल्या पहिल्या कसोटीत पुजारा हा पाचही दिवस फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे. पाचही दिवस फलंदाजी करणारा पुजारा हा जगातील नववा तर भारताचा तिसरा फलंदाज ठरला आहे. सर्वात आधी हा विक्रम 57 वर्षांपूर्वी भारताच्याच एम एल जयसिम्हा यांनी कोलकात्यातच केला होता. त्यानंतर भारतीय संघाचे विद्यामान मार्गदर्शक रवी शास्त्री यांनीही अशी कामगिरी केली होती. दरम्यान चेतेश्‍वर पुजाराने कोलकाता कसोटीत पहिल्या दिवशी नाबाद 8, दुसर्‍या दिवशी नाबाद 39, तिसर्‍या दिवशी 5, चौथ्या दिवशी नाबाद 2 आणि पाचव्या आणि शेवटच्या दिवशी तो 22 धावांवर बाद झाला. महत्त्वाचे म्हणजे पुजारासह तीन्ही भारतीयांनी ईडन गार्डन्सवरच हा विक्रम केला आहे.

कसोटीत पाचही दिवस फलंदाजी करणारे फलंदाज
एम एल जयसिम्हा (भारत) विरुद्ध ऑस्ट्रेलिया- कोलकाता 23 जानेवारी 1960
जेफ्री बॉयकॉट (इंग्लंड) विरुद्ध ऑस्ट्रेलिया – नॉटिंघम 28 जुलै 1977
किम ह्यूज (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध इंग्लंड- लॉर्ड्स 28 ऑगस्ट 1980
अ‍ॅलन लॅब (इंग्लंड) विरुद्ध वेस्ट इंडीज- लॉर्ड्स 28 जून 1984
रवी शास्त्री (भारत) विरुद्ध इंग्लंड- कोलकाता 31 डिसेंबर 1984
एड्रियन ग्रिफीथ (वेस्ट इंडीज) विरुद्ध न्यूझीलंड – हॅमिल्टन 16 डिसेंबर 1999
अँड्रूयू फ्लिटाँफ (इंग्लंड) विरुद्ध भारत – मोहाली 9 मार्च 2006
एल्विरो पीटरसन (दक्षिण आफ्रिका) विरुद्ध न्यूझीलंड – वेलिंग्टन 23 मार्च 2012
चेतेश्‍वर पुजारा (भारत) विरुद्ध श्रीलंका – कोलकाता 16 नोव्हेंबर 2017