थोड्याच वेळात मुख्यमंत्री आणि मराठा आंदोलकांमध्ये बैठक

0

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठा मोर्चाच्या आंदोलकांमध्ये थोड्याच वेळात महत्त्वपूर्ण बैठकीला सुरुवात होणार आहे. आंदोलनानंतर पहिल्यांदाच ही चर्चा होत आहे.

मराठा आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अहवाल मिळताच, आरक्षणाच्या कायद्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्यात येणार आहे. सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत शनिवारी हा निर्णय घेण्यात आला. आरक्षणासाठीच्या आंदोलनात हिंसाचार न करणा-या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची घोषणा बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

पोलिसांवर हल्ले, गाड्या जाळणे, तोडफोड, मारहाण यांत सहभागी असलेले वगळता, इतरांवरील गुन्हे तातडीने मागे घेण्याचे आदेश पोलीस महासंचालकांना दिले असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले. मराठा समाजासाठीची पदे रिकामी ठेवूनच राज्य सरकार मेगा भरती करणार आहे. या भरतीमुळे आपल्या नोकरीची संधी हुकेल, अशी भीती मराठा तरुणांनी बाळगू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. भरतीमध्ये अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी व इतरही समाज आहेत आणि त्यांच्या भरतीला मराठा समाजाचाही विरोध नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. मराठा आरक्षणासाठी मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष एम. जी. गायकवाड यांचा अहवाल महत्त्वाचा आहे. तो लवकर द्यावा, अशी विनंती भाजपाच्या नेत्यांनी त्यांना केली आहे. आता सर्वपक्षीय शिष्टमंडळही त्यांना भेटून विनंती करेल. सर्वपक्षीय भावना लक्षात घेऊन ते लवकर अहवाल देतील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.