थोर पुरूषाचे गीत न वाजवल्याने यावल पोलिस ठाण्यात जमावाचा ठिय्या

0

साकळी विद्यालयात घडली होती घटना ; चौकशी करून कारवाईचे पोलिसांचे आश्‍वासन

यावल- तालुक्यातील साकळीच्या शारदा विद्या मंदिर या विद्यालयात शुक्रवारी पार पडलेल्या स्नेहसंमेलनात थोर पुरूषांचे गीत ऐवेळी आयोजकांनी रद्द केल्यानंतर शाळा प्रशासन व व्यवस्थापणार गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी गावातील सुमारे दिड-दोनशे महिलांनी शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलनात सुरुवात केली. दुपारी चार वाजेपर्यंत चाललेल्या आंदोलनानंतर पोलिस निरीक्षक दत्तात्रय परदेशी यांनी चौकशी अंती दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, वादाच्या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारचे स्नेहसंमेलन अर्ध्यावरच उरकण्यात आले.

वाद उफाळल्याने स्नेहसंमेलनात धांदल
साकळीच्या शारदा विद्या मंदिर विद्यालयात शुक्रवारी स्नेहसंमेलनात थोर पुरूषाच्या एका गीतास आयोजकांनी नकार दिल्यावरून वाद उफाळला त्यामुळे काही काळ विद्यालय परीसरात धांदल उडाली तर वाद वाढत जावून नंतर याचे पडसाद गावात पोहचले. शनिवारी सुमारे दिड-दोनशे महिलांनी दुपारी एक वाजेच्या सुमारास यावल पोलिस ठाण्यात येवून विद्यालय प्रशासनासह संस्था चालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. युवराज सोनवणे, अरुण गजरे, आनंद मेघे, प्रमोद पारधे, विष्णू पारधे, राजु सोनवणे, प्रकाश मेघे, दगडू सपकाळे, अर्चन सुरवाडे, मीलींद जंजाळे, शरद बिर्‍हाडे यांनी निरीक्षक परदेशी यांच्याकडे बाजू मांडत दोषीवर कडक कारवाई मागणी केली. निरीक्षक परदेशी यांनी सहाय्यक निरीक्षक सुजीत ठाकरे यांच्याकडे चौकशी दिल्याचे सांगून जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर निश्‍चित कारवाई होईल, असे आश्‍वासन दिल्यानंतर जमाव माघारी परतला. दरम्यान पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आले. त्यावर मिलिंद जंजाळे, दशरथ इंगळे, विजय जंजाळे, दिपक इंगळे, सागर इंगळे, आर.पी.आय.उपाध्यक्ष राजु सोनवणे, शरद बि-हाडे यांच्या सहया आहेत.