थोर समाजसेविका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले

0

सातार्‍याच्या कुशीत जन्म घेतलेल्या एका स्त्रीने म्हणजे सावित्रीबाईंनी प्रथम स्त्री व शुद्र यांच्या शिक्षणासाठी केलेला प्रारंभ ते साल होते इ.स.1848. धर्म मार्तडांना धक्का देणारे. स्त्री मुक्ततेची व शिक्षणाची गंगोत्री वाहू लागली ती याचवर्षी 1 जानेवारी रोजी तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात ज्योतिराव फुले यांनी पहिली-वहिली शाळा उघडली.

3जानेवारी हा दिवस लहान मुलींच्या तसेच स्त्रियांच्या स्थितीकडे समाजाचे लक्ष वेधण्यासाठी आपल्या देशात साजरा केला जातो. स्त्रिया व मुली, या समाजातील काहीशा उपेक्षित घटकाला मानाने जगता यावे व त्यांची उन्नती व्हावी, या दृष्टीने भरपूर उपक्रम या दिवसापासून सुरु केले जातात. या सर्व उपक्रमांसाठी 3 जानेवारी हाच दिवस निवडण्याचे कारण म्हणजे 3 जानेवारी 1831 साली याच दिवशी, मुलींना शिक्षणाची दारे खुली करणार्‍या थोर समाजसेविका सावित्रीबाई फुले यांचा जन्म नायगाव येथील नेवसे दांम्पत्याच्या घरी झाला. क्रांतीज्योतील सावित्रीबाई यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे. खंडोजी गावचे पाटील. गावच्या पाटलाला प्रथम कन्यारत्न झाले म्हणून गावात आनंदाची लाट उसळली. या कन्यारत्नाला पाहण्यासाठी खंडोजी पाटलांच्या घरी हान थोर, बाया-बापड्या, वृद्धांची गर्दी होऊ लागली. यावेळेस बालकवींच्या जन्माची आठवण येथे होते. त्यांच्या जन्माच्या अगोदर त्यांच्या मातोश्रीला एका हस्तसामुद्रिक जाणणार्‍या सरस्वती नंदन नामक बुवांनी ‘बेटा बडा शायर होगा! किर्तीमान होगा!’ हे भविष्य वर्तविले होते. ते जसे पुढे खरे ठरले त्याप्रमाणे ‘सावित्रीच्या जन्मावरुन ती पुढे कोण होणार?’ याचा अंदाज खंडोजी पाटलांनी मनाशी बांधला असावा. आई-वडिलांच्या सुसंस्काराप्रमाणे सावित्री वाढू लागली. सावित्रीला शिंदूजी, सखाराम व श्रीपती हे भाऊ होते. पण लहानपणापासूनच सावित्री वडिलांच्या वळणावर गेलेली होती. बालपणीच सावित्रीने आई वडिलांकडून समाजसेवेचे छोटे-छोटे धडेही गिरविले. सावित्री खंडोजीची एकुलती एक मुलगी होती. तीन भावांची बहिण म्हणून आपल्या तोंडून तिच्याबद्दल पुढील उद्गार बाहेर पडू लागतात.

‘तीन भावांची बहिण। तीन लोकांत भाग्याची।
तिच्या पाठीशी पुण्याई। तीन मागील जन्मांची॥
आई तुझ्या संसाराचे। त्रिदल हे बेलपान।
त्यात एकटी मी भाबडी। कळी जाईची अजाण॥’

असेच बोल बोल करता सावित्रीला पाचवे वर्ष लागले. त्या काळी म्हणजे 19 व्या शतकामध्ये मुलगी 6 वर्षाची झाली म्हणून ‘घोडनवरी’ आणि मुलगा 13 वर्षाचा झाला की ‘घोडनवरा’ समजला जात असे, हे जाणून खंडोजींचे मन चिंतातूर होऊ लागले.

एक दिवस नामी संधी चालून आली. सगुणाबाई क्षीरसागर ही पुण्याजवळील धनकवडीच्या पाटलांची मुलगी तिच्या मायेच्या उबेत ज्योतिराव वाढलेले. त्यांनाही 13 वे वर्ष लागलेले, म्हणून गोविंदरावांनी सगुणाबाईला ज्योतिरावाला अनुरुप अशी वधू पाहावी, अशी इच्छा प्रकट केली. गोविंदराव खंडोजी यांच्या परिचयाचे होते. अन् सगुणाबाईचा आणि नेवसे घराण्याचा पूर्वीपासून संबंध इ.स.1840 सालातील फाल्गुन वदय पंचमीला नायगावातील सुवर्णक्षरांनी लिहिण्यासारखा हा दिवस. हा दिवस म्हणजे ज्योतिराव अन् सावित्रीबाई यांचा विवाहाचा दिवस. फुले-नेवसे कुटुंबातील विवाहात ज्योतिराव-सावित्री मोठ्या दिमाखात दिसत होते. जणू काही शहराजी-जिजाबाईची जोडीच. गुणरुपांचा अपूर्व संगम झाला होता. विवाहानंतर ज्योतीरावांनी शेतीच करावी, हा आग्रह गोविंदरावांनी धरला. मग ज्योतीराव शेतीत रमू लागले. सावित्रीबाई सुद्धा ज्योतीरावांबरोबर शेतावर काम करू लागल्या. शेत, पक्षी, गुरे-ढोरे, आंब्यांची गर्द छाया यांचा अनुभव त्यांनी बालवयातच घेतला होता. किंबहूना.

‘शेत नांगरणे, पेरणे सुखाने
फुलझाडे वाडीत शोभविणे
गुरे-ढोरे मी बाळगुणी काही दूधदूभते ठेवितो घरी पाही’…

असा अनुभव त्यांच्या अंगवळणी पडला होता. ज्योतीराव हे पहिले समाजसुधारक असे आहेत की, ज्यांनी निसर्ग-माध्यमाचा चपखल उपयोग करून स्त्री शिक्षणाचा ओनामा केला. सावित्रीबाई व सगुणाबाईची जिज्ञासा हेरुन ती पुर्णत्वास नेली. त्या दोघी पुढे उत्तम शिक्षिका म्हणून मिसेस मिचेल यांच्या स्कूलमधून बाहेर पडल्या. सावित्राबाईंना सासरघरी येऊन जवळ-जवळ सात वर्ष लोटून गेली. जीवनाला शिक्षणामुळे वेगळे वळण लागले. ज्ञानाशिवाय तरणोपाय नाही. याची जाण त्यांना आली. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांना मिशन यांच्या उदारमतवादी सहकार्यामुळे उत्तम शिक्षणाचा लाभ मिळाला. पुढे पुण्यासारख्या शहरात दलित-शुद्रांचे किळसवाण्या रुढी-परंपरामुळे किती हाल होत आहेत. त्यांनी हे पाहिले मग आपणही सत्यस्वरुप ज्योतीरावच्या समाजसेवा कार्याला हातभार लावला पाहिजे, असा विचार त्यांच्या मनात डोकावू लागला. दर बारा वर्षांनी माणसाचे मन हे बदलत असते, असे कै.भाऊसाहेब खांडेकर म्हणत. त्याप्रमाणे सुजाण झालेल्या सावित्रीबाईंचे मन बदलले. कुणीतरी आपल्याला समाजसेवा दीन-दुबळ्यांची सेवा करण्यासाठी पुकारत आहे, असे त्यांना वाटू लागले. पुण्यामध्ये स्त्रियांच्या करुण कहाण्या जेव्हा त्यांना प्रत्यक्ष पाहावयास मिळत अथवा ऐकावयास मिळत तेव्हा त्यांचे अंत:करण पिळवटून जात असे, अशा परिस्थितीत ज्योतीराव व सावित्राबाई यांच्या विचारांचा सुर जमला आणि त्यातून सामाजिक व शैक्षणिक कार्याचे गोडगीत निर्माण झाले, मग…

‘देवाच्या सख्यत्वासाठी। पडाव्या जिवलगांसी तुटी॥
सर्व अर्वावे शेवटी। प्राण तो ही वेचावा॥’…

अशी वृत्ती त्यांची बनली. समाजसेवेला वाहून घेण्याचा त्यांचा निश्‍चय पक्का झाला.
महाराष्ट्राच्या इतिहासात ज्या-ज्या महत्वाच्या व तोलामोलाच्या घटना घडल्या, त्यापैकी एक महत्वाची घटना म्हणजे सातार्‍याच्या कुशीत जन्म घेतलेल्या एका स्त्रीने म्हणजे सावित्रीबाईंनी प्रथम स्त्री व शुद्र यांच्या शिक्षणासाठी केलेला प्रारंभ ते साल होते इ.स.1848. धर्म मार्तडांना धक्का देणारे. स्त्री मुक्ततेची व शिक्षणाची गंगोत्री वाहू लागली ती याचवर्षी 1 जानेवारी रोजी तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात ज्योतिराव फुले यांनी पहिली-वहिली शाळा उघडली. विविध जाती जमातीतील सहा मुली या शाळेत प्रथम येत होत्या. पण एवढ्याशा प्रयत्नाने व एका शाळेने स्त्रियांचे अज्ञान थोडेच नष्ट होणार? असा विचार करून 15 मे 1848 मध्ये पुण्यात महारवाड्यात आणखी एक शाळा फुलेंनी काढली. ध्येयवेडे ज्योतिराव ध्येय साकार करण्यासाठी धडपडत होते. अशा वेळी त्यांना मोलाची साथ दिली ती सावित्रीबाईंनी. या शाळेत सावित्रीबाईंनी शिक्षिकेचे काम स्वीकारले. हे तेथील लोकांना समजल्यावर त्यांच्या अंगाचा तिळपापड होऊ लागला. परंतू सावित्रीबाईंनी शांततेने आपले शिकविण्याचे काम सुरुच ठेवले. ज्योतीरावांनी सुरु केलेल्या शाळेच्या सावित्रीबाई मुख्याध्यापिका झाल्या. भारताच्या इतिहासातील पहिल्या स्त्री मुख्याध्यापिका होण्याचा मान त्यांच्याकडे जातो. या कार्यात मात्र त्यांना अनन्वीत छळ सोसावा लागला. कर्मठ व धर्म मार्तंड लोकांनी त्यांच्यावर शेणामातीचा वर्षाव केला. तेव्हा त्यांच्या तोंडून पुढील नम्र उद्गार बाहेर पडले. “बंधूनो, मी आपल्या धाकट्या भगिनींना शिकविण्याचे पवित्र कार्य करीत आहे.”… आपण माझ्यावर हे शेण अगर खडे फेकीत नसून मला उत्तेजनासाठी ही फुले उधळीत आहात. ईश्‍वर तुम्हाला सुखी ठेवो, अशी ही देववाणी तात्पर्य, थोर विभूती नेहमी समाजाचे व दैवाचे तडाखे मूकपणे सहन करून आपले कार्य चालू ठेवतात. सावित्रीबाई पुढे आता एकच ध्येय होते. आणि ते म्हणजे शुद्र गांजलेल्या जनतेला विशेषत: स्त्रियांना जर चांगले दिवस यावयाचे असतील तर एकच रामबाण उपाय आणि तो म्हणजे शिक्षण. केवढा हा प्रपंच। म्हणून ज्योतीराव फुले यांनी उघडलेल्या शाळांचे धुरिणंत्व त्यांनी कुशलतेने केले. 3 जुलै 1851 रोजी निघालेली आणखी एक शाळा, असा कार्याचा व्याप वाढत गेला. आर्थिक ओढाताण होऊ लागली. त्यातून चोखंदळपणे मार्ग निघाला. पुढे इ.स.1852 पर्यंत शाळांची संख्या 18 पर्यंत नेली. असाच आदर्श डोळ्यांपुढे ठेवून शैक्षणिक कार्याचा वेलू गगनावरी जाऊ लागला.

इ.स.1897 चा कालखंडात महाराष्ट्रात एक आपत्ती येऊन कोसळली. प्लेगच्या साथीने संबध महाराष्ट्रभर धुमाकूळ घातला. अशा या प्लेगच्या साथीला अनेक लोक बळी पडत होते. पद्दलितांना व अस्पृश्यांना या रोगापासून वाचविण्यासाठी सावित्रीबाईंनी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली. डॉ.यशवंत यांच्या दवाखान्यात अनेकांना उपचार करणत आले. पण एकट्या सावित्रीबाई आभाळाला ठिगळ कोठेपर्यंत लागणार? त्यांनी एके दिवशी एका हरिजन मुलाला पाहिले. प्लेगने त्याला पछाडले. होते. त्याला खांद्यावर टाकून तडक डॉ.यशवंत यांच्या दवाखान्यात आणले. परंतू नियतीचा डाव वेगळाच होता. त्या प्लेगचा त्यांच्यावर परिणाम झाला. दीनांची माऊली, स्त्री-शुद्र उद्धारक 10 मार्च 1897 रोजी काळाने ओढून नेली.कवी मंगश पाडगावकर आपल्या ‘जिप्सी’ काव्यसंग्रहातील एका कवितेत म्हणतात की,

“हात हवे मज नितांत वत्सल
क्षमाशील जे क्षमेहुनीहो
पुण्यशील जे गंगेहुनीही
जे मायेचा घास भरविती,
चिमण्या ओठी जे चूकलेल्या
पांथस्थांना दीपच होती…”

सावित्रीबााई फुले यांच्या कार्याला हुबेहुब या काव्यपंक्ती लागू लागतात.
अशी या दीन माऊलींची कथा, तपस्विनी गंगेप्रमाणे निर्मळ, विलाससुंदरा यमुना नदी गंगेच्या पुढ्यात आल्यावर जशी थबळते. त्याचप्रमाणे सावित्रीबाई ज्योतीराव फुले यांच्या कार्यामुळे अनेक समाजसुधारक थबळतात. त्यांच्या अजोड कार्याबद्दल शेवटी असे म्हणावे लागते की,
“तुला आळविता जीवस सरावे…”
अशा या माऊलीला माझे कोटी कोटी वंदन प्रणाम।

– प्रासंगिक
किरण पाटील
9270860296