भीमा कोरेगाव दंगलीबाबत शरद पवार यांची राज्य सरकारला सूचना
अकलूज : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण हे बाहेरच्या लोकांनी घडवले आहे. त्या बाहेरच्या लोकांना सरकारने शोधावे आणि त्यांना कठोरातली कठोर शिक्षा द्यावी, अशी सूचना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी राज्य सरकारला केली. अकलूज येथील रत्ना महिला वसतिगृहाच्या उद्घाटन समारंभात पवार बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, खासदार विजयसिंह मोहिते पाटील इत्यादी नेते उपस्थित होते. राज्यातील शेतकर्यांच्या भीषण अवस्थेवरूनही पवारांनी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले.
सरकार खाणार्यांचा विचार करते
राज्य सरकारची धोरणे व भीमा कोरेगाव दंगलीच्या पार्श्वभूमीवर सरकारवर टीका करताना पवार म्हणाले, आम्ही पिकवणार्यांचा विचार करतो आणि सरकार खाणार्यांचा विचार करते आहे. सरकारने आता त्यांचे धोरण बदलण्याची गरज आहे. पिकवणारा जगला तर खाणारा जगेल ही गोष्ट सरकारने लक्षात घेतली पाहिजे असेही शरद पवारांनी म्हटले आहे. काही लोकांनी शेतकर्यांच्या कर्जमाफीवर टीका केली होती. 40-40 टन उस उत्पादकांना कर्जमाफी हवी? असा प्रश्न विचारला होता. मात्र शेतकर्याची अवस्था खरेच वाईट आहे हे त्यांना ठाऊक नसावे, असा टोला शरद पवारांनी लगावला.
बँकांना 80 हजार कोटी कसे दिले?
बँकांची वित्तीय तूट भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने 80 हजार कोटी रूपये भरले पण शेतकर्यांना कर्जमाफी देताना, त्याच्या डोक्यावरचे कर्जाचे ओझे कमी करताना या सरकारच्या पोटात दुखते. जीएसटी आणि नोटाबंदी या दोन्ही निर्णयांमुळे देशाची आर्थिक अवस्था बिकट असून त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. सांख्यिकी विभागाने दिलेल्या माहितीनुसार या वर्षी देशाचा विकास दर घसरण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शेती विकास दर घसरण्याचाही अंदाज व्यक्त झाला आहे. शेतीकडे सपशेल दुर्लक्ष करण्याचे धोरण या गोष्टीसाठी कारणीभूत आहे, असाही आरोप यावेळी शरद पवारांनी केला.
काँग्रेस-राष्ट्रवादीने एकसंघ राहावे
नागपूरमधील हिवाळी अधिवेशनानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले आहेत. ही समाधानाची बाब आहे. या सरकारच्या विरोधात काम करण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे. असे झाले तरच या सरकारला योग्य प्रत्युत्तर देऊ शकू असे शरद पवार म्हणाले.