दंगलवरून सुरु झाली नाराजीची ‘दंगल’!

0

नवी दिल्ली : आमीर खान अभिनित दंगल सिनेमा रिलीज झाल्यानंतर चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. गीता फोगटचे प्रशिक्षक नाराज झाल्यानंतर खुद्द गीताने देखील आम्ही पप्पा अर्थात महावीर फोगट यांना कधीच खोलीत बंद केले नव्हते असे सांगून चित्रपट रंजक व्हावा यासाठी असे करण्यात आले असल्याची स्पष्टोक्ती दिली आहे. सिनेमात व्यक्तीरेखा निगेटिव्ह दाखवल्याने पैलवान गीता फोगाटचे खरे प्रशिक्षक नाराज आहेत. सिनेमात आपली व्यक्तीरेखा खलनायकाची दाखवल्यामुळे प्रशिक्षक प्यारा राम सोंधी कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करत आहेत. ‘दंगल’ हा सिनेमा हरियाणाच्या पैलवान गीता आणि बबिता फोगाट यांच्या जीवनावर आधारित आहे. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर यातील एका दृश्यावर वाद सुरु झाला आहे. सध्या गीता दिल्लीतील बवानामध्ये नांगल ठाकरान यांच्या राकेश पैलवान आखाड्यात सराव करते. राकेश पैलवान यांचा छोटा भाऊ पवनसोबत याचवर्षी 20 नोव्हेंबरला गीताचे लग्न झाले आहे. गीताचा पतीही एक पैलवान आहे. गीताच्या लग्नाला आमीर खान स्वता उपस्थित होता, मात्र या गोंधळावर त्याची काही प्रतिक्रिया आलेली नाही.

सिनेमा रंजक करण्यासाठी बदल
सिनेमाबाबत बोलताना गीता फोगाट म्हणाली की, ‘काही बातम्यांमधून मला समजलं की, ते कायदेशीर कारवाई करण्याच्या विचारात आहेत. पण ते जे आरोप करीत आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की, सिनेमात कुणाचेही नाव घेण्यात आलेले नाही. तसंच सिनेमा रंजक व्हावा यासाठी काही गोष्टीचा त्यात समावेश करण्यात आला आहे.’ ‘सिनेमा रंजक व्हावा यासाठी असे करण्यात आले आहे. तसेच हे अजिबात खरे नाही की, वडिलांना खोलीत डांबले होते. पण ही गोष्ट खरी आहे की, वडिलांना रेसिलंग एरियात प्रवेश करु दिला नव्हता. कारण की, तिथं फक्त खेळाडू आणि प्रशिक्षक राहतात. पण वडिलांची इच्छा होती की, आमच्यासोबत राहावं.’ असंही गीता म्हणाली. आम्हाला वाटते की, जेव्हा पप्पासोबत असतात तेव्हा आम्ही चांगली कामगिरी करतो. जर ते प्रेक्षकांमध्ये बसले तर आमच्यापर्यंत त्यांचा आवाज येत नाही.’ असे उत्तर गीताने दिले आहे.

निगेटिव्ह व्यक्तिरेखेमुळे गीताचे खरे प्रशिक्षक नाराज
आमीर खानच्या ‘दंगल’ सिनेमात आपली व्यक्तीरेखा निगेटिव्ह दाखवल्याने पैलवान गीता फोगाटचे खरे प्रशिक्षक नाराज आहेत. सिनेमात आपली व्यक्तीरेखा खलनायकाची दाखवल्यामुळे प्रशिक्षक प्यारा राम सोंधी कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करत आहेत. पण प्यारा राम त्याआधी त्यांच्या निकटवर्तीयांशी चर्चा करणार आहेत. सिनेमात दाखवलेल्या माझ्या व्यक्तिरेखेबाबत मी आधी आमीरशी बोलणार आहे. जर माझे समाधान झाले नाही तर या प्रकरणी कायदेशीर कारवाई पण करणार असल्याचे सांगत आमीरसारख्या मोठ्या कलाकाराकडून ही अपेक्षा नव्हती, असेही ते म्हणाले. लुधियानामध्ये चित्रपटाचं शूटिंग सुरु असताना मी माझ्या तीन सहकाऱ्यांसोबत सेटवर गेलो होतो. तिथे आमची भेट आमीर खान आणि दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्यासोबत झाली. पण त्यांनी सिनेमाच्या कोणत्याही सीनबाबत आमच्याशी बातचीत केली नाही. इतकंच नाही तर चित्रपटात काय दाखवणार हेदेखील माहित नव्हतं. हा सिनेमा महावीर फोगाट यांच्या आयुष्यावर आधारित आहे, एवढेच मला माहित होते, असे प्यारा राम यांनी सांगितले. राष्ट्रीय पुरुष संघाचे प्रशिक्षक विनोद कुमार यांनीही प्यारा राम सोंधी यांचे समर्थन केले आहे. “नॅशनल कॅम्पदरम्यान गीताचे वडील पटियालामध्ये एका भाड्याच्या खोलीत राहत होते. पण त्यांनी कधीही प्रशिक्षकांच्या कामात हस्तक्षेप केला नाही. कॉमनवेल्थ गेम्सदरम्यान, सुरक्षा एवढी कडेकोट होती की, असे करण शक्यच नाही,” असे विनोद कुमार म्हणाले.

कोणत्या सीनवर आक्षेप?
सिनेमात एक सीन आहे, ज्यात गीताचा अंतिम सामना असतो, तेव्हा प्रशिक्षक कट रचून तिच्या वडिलांना एका खोलीत डांबून ठेवतो. गीताच्या यशाचं श्रेय वडिलांना मिळू नये, यासाठी प्रशिक्षक हे कृत्य करतो. या कटात यशस्वी झाल्यानंतर कोचचा एक डायलॉग आहे, क्रेडिट मेरे पप्पा को जाता है, जा ले ले क्रेडिट! अंधाऱ्या खोलीत बंद असलेल्या महावीर यांना गीताचा अंतिम सामना पाहता येत नाही. प्यारा राम म्हणाले की, चित्रपट रंजक बनवण्यासाठी हे सगळं केलं आहे, पण असं काहीही घडलेलं नव्हतं.

दंगलमुळे परिवार लोकप्रिय- विनेश
आॅलिम्पियन विनेश फोगाटने हलक्याफुलक्या अंदाजामध्ये म्हटले की, त्यांचे काका महावीर सिंग फोगाट ‘दंगल’ चित्रपटामध्ये ‘बापू हानिकारक’ची भूमिका निभावणाऱ्या आमीर खानपेक्षा दहा पटीने शिस्तप्रिय होते. हा चित्रपट सुप्रसिद्ध कोच आणि त्यांच्या शालेय जीवनावर आधारित आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदकधारी विनेश यामुळे खूपच खूष होती़ दंगलने लोकांना महावीर फोगाट आणि त्यांच्या पहिलवान मुलगी व पुतणीबाबत लोकांमध्ये उत्सुकता वाढविली आहे. विनेश म्हणाली, हे आश्चर्यजनक आहे की दंगलच्या रिलिजनंतर संपूर्ण फोगाट परिवार खूपच लोकप्रिय झाला आहे.