दंगलीचा तपास सीबीआयकडे द्या किंवा एसआयटी स्थापन करा

0

पुणे । 1 जानेवारी, 2018 रोजी कोरेगाव भीमा परिसरात झालेल्या हिंसाचारात एक जण मृत्युमुखी पडला, अनेक जण जखमी झाले व कोट्यवधींच्या मालमत्तेचे नुकसान झाले. या विषयात पूर्वसूचना मिळूनही पुणे ग्रामीण पोलिसांकडून तत्काळ कारवाई केली नाही व योग्य खबरदारी घेतली नाही असा आरोप मराठा युवा संघाचे कार्यवाह दत्ता शिर्के यांनी केला आहे. कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी रोजी झालेल्या दंगलीच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करावे अथवा सीबीआयकडे तपास देण्यात यावा, अशी मागणी मराठा युवा संघ तर्फे करण्यात आली आहे. या दंगलीमागे कुणाचे षडयंत्र होते का याचाही छडा लावावा अशी मागणी करण्यात आली आहे.

पोलिस वेळेत आले असते तर…
कोरेगाव भीमा हिंसाचार संबंधित एकूण परिस्थिती पाहता वढू बुद्रुक या ऐतिहासिक गावात झालेला वाद महत्वाची घटना ठरते. छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळासाठी प्रसिद्ध आहे. संभाजी महाराजांचे अंत्यसंस्कार कोणी केले याबाबत गेल्या काही वर्षांपासून वाद सुरु आहे. वादग्रस्त इतिहास असलेला फलक गावात लागल्याने दोन समाजात वाद निर्माण होऊन त्याचे रुपांतर पुढे दंगलीत झाले. मात्र, हा वादग्रस्त फलक 28 डिसेंबर रोजी बेकायदेशीरपणे लागत असताना गावचे पोलिस पाटील यांनी पोलिसांना कळवून ही योग्य खबरदारी न घेत्याने वाद चिघळला. तसेच 1 जानेवारीला भगवे झेंडे घेऊन येणार्‍या गटाला पोलिसांनी थांबवून न धरता वढू बुद्रुक पासून 3 किमी कोरेगाव भीमाला येऊ दिले व तेथे हिंसक घटना घडल्या, असे, मराठा युवा संघाने म्हटले आहे.

सशस्त्र हल्लेखोर हे शोधा
या दंगलीमागे नक्षलवादी गटांचे षडयंत्र आहे, अशी माहिती गुप्तचर विभागाकडून प्राप्त झाल्यासंबंधी वृत्त प्रसिद्ध झाले आहे. एटीएसने अटक केलेल्या 7 संशयित माओवाद्यापैकी काही जण 1 जानेवारीला कोरेगाव भीमा परिसरात आले होते, असेही वृत्त आहे. तर, नक्षलवादाशी संबंध असेलेले काही जण 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यात शनिवारवाडा येथे पार पडलेल्या एल्गार परिषदेच्या आयोजनात होते, त्यांच्यावर गुन्हा ही दाखल आहे. या सर्वाचा एकत्रित तपास व्हावा, अशी मागणी मराठा युवा संघाने केली आहे. तसेच उपलब्ध व्हीडीओमध्ये पोलिसावर व नागरिकांवर जीवघेणा हल्ला करणारे बाहेरून आलेले सशस्त्र टोळ्या दिसत आहेत. हे सशस्त्र हल्लेखोर आंबेडकरी नसून, आंबेडकरी समाजात घुसलेले जहाल डाव्या विचारांचे लोक असू शकतात, अशी शंका मराठा युवा संघाने व्यक्त केली आहे.

दोन समिती का नाही
तपास करताना वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्‍वास नांगरे पाटील साहेब यांनी केवळ दलित समाजाची समन्वय समिती स्थापन केली व या समितीने सत्यशोधन अहवाल प्रसिद्ध केला. मात्र गृह विभागाने अशा प्रकारे अहवाल तयार करण्यासाठी कोणतीच समिती तयार केली नव्हती असा खुलासा केला. दोन्ही समाजाची समन्वय समिती तयार करायला हवी होती अथवा कोणतीच समिती न करता पोलिसांनी तपास न केल्याने वाद निर्माण झाले व समाजात असंतोष वाढला, असे ही मराठा युवा संघाने म्हटले आहे.

वढू बुद्रुक येथे 1 जानेवारी रोजी कादिर खान नावाचे बनावट आधार कार्ड सापडल्याबाबत विशेष तपास झाला नाही असेही नमूद केले आहे. मराठा युवा संघाने कोरेगाव भीमा हिंसाचाराचा विविध अंगाने तपास व्हावा म्हणून विशेष तपास पथक स्थापन होऊन हिंदुत्ववादी नेत्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांचा सखोल तपास करावा अशी मागणी केली आहे. हिंसाचारास निमित्त ठरलेले वढू बुद्रुक येथे ग्राम पंचायतीची परवानगी न घेता वादग्रस्त इतिहास असलेला फलक हिंदुत्ववादी गटांनी लावला नव्हता, तर मग तो लावण्यासाठी आलेले गावाबाहेरील लोक कोण, त्यांच्या संघटना कोणत्या, त्यांनी काही पूर्वनियोजित कट रचला होता याचा सखोल तपास व्हावा.