भुसावळ । शहरातील जाम मोहल्ल्यात दंगल उसळून दोन गट समोरा-समोर भिडल्याचा दूरध्वनी शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुरुवारी 11.30 वाजता धडकला अन् सुरक्षा यंत्रणेची धावाधाव सुरू झाली. सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल व पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदेंनी आपल्या कर्तव्यदक्षतेचा प्रत्यय देत सर्वात आधी घटनास्थळ गाठले तर काही वेळेत शहरातील ईआरटी, आरसीपी टीमही धडकली. यानंतर शहर व तालुका पोलिसांनी घटनास्थळाला कडे केले मात्र ही केवळ पोलिसांच्या सतर्कतेची रंगीम तालीम (मॉक ड्रील) असल्याचे कळताच पोलिसांच्या जीवही भांड्यात पडला.
पोलीस सजग, सज्जतेची खातरजमा
लाडक्या गणरायाच्या उत्सवाला शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे याच दरम्यान बकरी ईद सणासह अन्य सणही जवळ आल्याने शहराच्या शांततेला गालबोट लागू नये व कुठल्याही अप्रिय घटनांचा तातडीने सामना करण्यासाठी पोलीस दल कितपत सज्ज आहे याची खातरजमा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने सहा.अधीक्षक नीलोत्पल यांनी घेतली तर या परीक्षेत पोलीस दलही सजग असल्याने पास झाले.
गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी पोलीस सज्ज
लाठ्या-काठ्यांसह ढाल, प्लॅस्टीक बुलेट, गॅस गन, ग्रॅनेड्स आदी सर्व शस्त्रानिशी सज्ज पोलिसांना पाहताच परीसरातील नागरिकांचीदेखील चांगलीच गर्दी जमली तर पोलीस दल सज्ज असल्याचा प्रत्ययही नागरिकांना आला.