केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे प्रतिपादन
मुंबई:- सरकार कुणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत नाही. कोरेगाव भीमाच्या दंगलीबाबत सरकारकडे पुरावे असतील तर सरकार संभाजी भिडे यांच्या विरोधातही कारवाई करेल. या दंगलीतल्या दोषींना शिक्षा व्हावी अशी आमच्या पक्षाचीही मागणी आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विधानभवनात आयोजित पत्रकार परिषदेत संगितले. यावेळी प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे सरकार अडचणीत येतंय का? यावर आठवले यांनी सांगितले की, सध्या सरकारला अडचणीत आणण्यापेक्षा मला अधिक अडचणीत आणायचा प्रयत्न प्रकाश आंबेडकर करत आहेत.
मोदी मुक्त भारत करणे अशक्य
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या भाषणात मोदी मुक्त भारताची हाक दिली होती. याबाबत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांना विचारणा केली असता, मोदी मुक्त भारत करणे हे येड्या-गबाळ्यांचे काम नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता अजूनही टिकून आहे. देशभरात मोदींनी यश मिळवले आहे, अशा शब्दांत आठवलेंनी राज ठाकरे यांना चिमटा काढला. ईशान्येकडील राज्यात नुकतीच भाजपने सत्ता हस्तगत केली आहे. मोदी मजबूत आहेत, म्हणूनच त्यांना पराजित करण्यासाठी विरोधकांना आपापसातील मतभेद विसरून एकत्र यावे लागत आहे. यातच सर्व काही आले असे आठवले म्हणाले. त्यामुळे राज ठाकरे मुक्त महाराष्ट्र करावा, असे मी म्हणणार नाही. त्यांनी राजकारण करावे अन् आपले राजकीय वजनही विचारात घ्यावे. त्यांचा एकच आमदार सभागृहात आहे, याची आठवणही यावेळी आठवले यांनी करून दिली.