सणसवाडी । पोलिसांना पूर्व सूचना असूनही कोरेगाव भीमा येथील दंगलीवर नियंत्रण मिळवणे जमले नाही हे गृहखात्याचे अपयश आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य प्रवक्ते विकास लवांडे यांनी केला आहे. कोरेगाव भीमा, सणसवाडी येथे 1 जानेवारीला उसळलेल्या दंगलीत दोन्ही गावांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. सणसवाडी येथील युवक राहुल बाबाजी फटांगडे याचा या दंगलीत मृत्यू झाला. त्याचा दशक्रीया विधी बुधवारी सकाळी कान्हूर मसाई येथे विधिवत पार पडला. पंचक्रोशीतील गावांनी राहुलला शोकाकुल परिस्थितीत अखेरचा निरोप दिला. यावेळी फटांगडे कुटुंबाचे दुःख अनावर झाले होते. स्थनिक नेत्यांनी फटांगडे कुटुंबाचे सांत्वन केले. त्यावेळी लवांडे बोलत होते.
शांततेचे आवाहन
बाजार समिती संचालक दत्ताभाऊ हरगुडे, काँग्रेस तालुका अध्यक्ष वैभव यादव, पंचायत समिती सभापती सुभाष उमप यांनी शांतता व सलोखा राखण्याचे आवाहन यावेळी केले. पंचक्रोशीतल मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने याप्रसंगी उपस्थित होते. शेवाळे महाराज यांनी उपस्थित जनसमुदायास सज्जन व दुर्ज्जन यांची महती सांगितली. बाजार समिती सभापती शशिकांत दासगुडे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी कान्हूर मसाईचे माजी उपसरपंच दीपक तळोळे यांनी प्रास्तविक, सूत्रसंचालन तर सरपंच दादासाहेब खर्डे यांनी आभार मानले.
आंदोलनाचा इशारा
कोरेगाव भीमा दंगलीची चर्चा विधीमंडळात होत असून नेत्यांनी जातीपातीचे राजकारण न करता सामाजिक सलोखा ठेवावा व सूत्रधाराला शोधून काढावे, असे आवाहन लवांडे यांनी यावेळी केले. राहुलच्या खुन्याच्या शोध घ्यावा. पुरावे असूनही मारेकरी मोकाट सुटत असेल तर मोर्चातून राज्यभर आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा शिवप्रहार संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष संजीव भोर यांनी दिला. पोलिस प्रशासनास नियोजन करता आले नाही. एक महिना अगोदर नियोजन करायला पाहिजे होते. या दुर्घटनेत प्रशासनाने दिरंगाई केली. खरे गुन्हेगार सोडून स्थानिकांना जर त्रास देणार असेल तर रस्त्यावर उतरू, असे जयश्री पलांडे यांनी सांगितले.