औरंगाबाद/पंढरपूर : भिमा कोरेगावला घडलेली दंगल हे राज्य सरकार व गृहखाते सांभाळणार्या मुख्यमंत्र्यांचे अपयश असून या घटनेस राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप विधान परिषदेते विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यात दुर्लक्ष का झाले? राज्य सरकार म्हणून तुम्ही काय करत होतात? असा प्रश्न मुंडे यांनी राज्य सरकारला विचारला आहे. धनंजय मुंडे यांनी येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. काँग्रेस नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही कोरेगाव भीमाप्रकरणी राज्य सरकारवर हल्लाबोल केला असून चौकशीची मागणी केली आहे. तसेच प्रकाश आंबेडकर यांनी घटनेला आठवडा होऊनही कुणालाही अटक झालेली नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
दंगल हे सरकारचे अपयश
धनंजय मुंडे, भाजपचे जबाबदार समजले जाणारे शाम जाजू यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजाच्या बाबतीत बोलणे हा छत्रपती शिवरायांचा अपमान आहे. भाजपला जातीय तेढ निर्माण करायची असून मागील साडे तीन वर्षांत हेच दिसून आले आहे. भिमा कोरेगाव प्रकरणी झालेली दंगल हे सरकारचे अपयश असून जातीय तेढ निर्माण करणारे कोण आहेत? हे सरकारला माहीत नाही का? असा प्रश्नही त्यांनी विचारला. दंगलीला जबाबदार असलेले कुठल्याही जातीचे, पक्षाचे, संघटनेचे असोत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी राष्ट्रवादीची मागणी असल्याचे मुंडे म्हणाले.
देगड फेकीला सुरूवात कुणी केली?
भाजपा सरकार सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्रात आजपर्यंत सामाजिक ताणतणाव, वाद निर्माण झाले आहेत. सरकारकडून समाजातील सर्व घटकांवर अन्याय होत आहे. कोरेगाव-भीमा येथे सुरुवातीला कोणी दगडफेक केली? का केली? या प्रश्नांची उत्तरे सरकारने शोधायला हवीत. प्रकाश आंबेडकर यांनी ज्यांची नावे घेतली, त्यांची चौकशी व्हावी, असे मत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले आहे. पंढरपूर येथे खासगी कामानिमित्त आल्यानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ज्या सरकारला साधा रस्त्यावर पडलेला खड्डा बुजवता येत नाही, जर खड्डा बुजवलाच तर त्याचे पैसे देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत, त्यांनी काय राज्याचा विकास केला? दोन समाजामध्ये तेढ निर्माण करुन, लोकांच्या भावना भडकावून किती दिवस राज्य चालविणार, असा टोला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपा सरकारला लगावला आहे.
सुत्रधार शोधून पुरावे देणार : प्रकाश आंबेडकर
मुंबई : कोरेगाव भीमा येथील दगडफेकीमागे कुणाचे डोके आहे. याचा शोध घेऊन पुरावे देऊ असे भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. या प्रकरणानंतर राज्यातील बहुजन समाजात सरकारविषयी सापत्न भावाची भावना निर्माण झाली आहे. कोरेगाव भीमाच्या दंगलीला आठवडा उलटला आहे. पुण्यात संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पण अद्याप सरकारने त्यांना अटक केलेली नाही. याप्रकरणी सोशल मीडियात अपप्रचार देखील केला जात आहे. सरकार या प्रकरणाकडे गांभीर्याने पहात नसल्याने आम्ही स्वतःच आता कोरेगाव भीमाच्या दंगलीप्रकरणी शोध मोहीम हाती घेणार असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.