पुणे: कोरेगाव भीमा शौर्य दिनानिमित्त विजयी स्तंभाला अभिवादन करण्यासाठी कोरेगाव-भीमा येथे मोठ्या प्रमाणात जनसागर उसळला आहे. या ठिकाणी काही लोकांचा कोरेगाव-भीमा येथे दंगल घडवण्याचा डाव होता. आम्ही सत्ताधाऱ्यांसोबत बसून हा डाव उधळून लावला, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. कोरेगाव-भीमा येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
विजयी स्तंभाला अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रकाश आंबेडकर यांनी अभिवादन केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना शांततेचं आवाहन करत अफवांवर विश्वास ठेवू नका. जातीय सलोखा ठेवण्याची आपली परंपरा आहे. ही परंपरा कायम ठेवण्याचे सांगितले. दरम्यान, छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीस्थळालाही पवार यांनी अभिवादन केलं.
सत्ता बदलल्याने त्याचा राजकीय फायदा घेण्यासाठी काही लोकांचा आज दंगल घडवून आणण्याचा प्रयत्न होता. पण सत्ताधाऱ्यांसोबत बसून आम्ही हा डाव उधळून लावला आहे, असं आंबेडकर म्हणाले. या परिसरात रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांच्या आणि दलित संघटनांच्या दुपारी सभा होणार आहेत. रिपब्लिकन नेते, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचीही दुपारी सभा होणार आहे. अनुचित प्रकार होऊ नये म्हणून ठिकठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. एकूण ४०० वरिष्ठ अधिकारी आणि १० हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याशिवाय कोरेगाव-भीमा परिसरावर सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनचा वॉचही ठेवण्यात आला आहे.
Prev Post