दंगेखोरांचा कायमचा बंदोबस्त करण्याची गरज : पालकमंत्री संतापले

0

रावेरातील दंगलग्रस्त भागाची पाहणी : जमावबंदीनंतरही गुलाबरावांभोवती जमावाचा गराडा

रावेर : रावेर शहरात दंगलीची जणू सिरीयलच सुरू झाली असून दर पाच वर्षानी जर शहरात दंगल होत असेल तर याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज असून दंगलखोरांचा कायमचा बंदोबस्त करावा लागणार आहे. देशावर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना रावेरमध्ये दंगल करताना दंगेखोरांना लाज कशी वाटली नाही? अशा तिखट शब्दात पालकमंत्र्यांनी रावेरातीही परीस्थितीवर भाष्य केले. रावेरातील दंगलीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील मंगळवारी रावेरात आले होते. विशेष म्हणजे, सर्वत्र संचारबंदी व जमावबंदी आदेश लागू असताना पालकमंत्र्यांना येथे गराडा पडल्याचे चित्र होते.

रावेरात दुकानाबाहेर लागल्या रांगा
रविवारी रात्री रावेर शहरात दंगल उसळली होती त्यानंतर तिसर्‍या दिवशी मंगळवारी दुपारी 11 ते एक वाजेच्या दरम्यान प्रांताधिकारी अजित थोरबोले यांनी दोन तासाची शिथीलता दिल्यानंतर शहरात बंदीस्त असलेल्या लोकांनी जीवनावश्यक वस्तुची खरेदी करण्यासाठी प्रचंड गर्दी केली. यामध्ये नागरीकांनी सुपरशॉप, किराणा दुकानांमध्ये किराणा घेण्यासाठी तर इतर ठिकाणी भाजीपाला खरेदी तर काहींनी एटीएममधून पैसे काढण्यासाठी गर्दी केली. यावेळी दोन तास संपताच शहरात पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली.

पालकमंत्र्यांभोवती मोठा गराडा
आधीच कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत असतांना गर्दी कमी करण्यासाठी प्रशासन कठोर पावले उचलत असून महाराष्ट्रभर संचारबंदी लावत आहे परंतु रावेरात पालकमंत्री गुलाबराव पाटील पोलिस स्टेशनला आले असता त्यांच्या अवती-भवती लोकांचा गराडा पडला होता. यावेळी त्यांच्या सोबत आमदार शिरीष चौधरी, आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हा परीषद सदस्य नंदकिशोर महाजन, प्रल्हाद महाजन, पद्माकर, महाजन, अशोक शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

दंगेखोरांना शोधण्याचे पोलिसांपुढे आव्हान
रविवारच्या रात्री उसळलेल्या दंगलीनंतर अंधाराचा फायदा घेऊन खरे दंगेखोर पसार झाले व मंगळवारी प्रशासनाकडून दिलेल्या शिथीलतेचा फायदा घेऊन उरल्या-सुरल्या दंगेखोरांनी पलायन केले आहे. आता शहरात उरलाय तो फक्त सन्नाटा आणि भयान शांतता आणि जनतेचे रक्षण करणारे पोलिस त्यामुळे पलायन केलेल्या दंगेखोरांना शोधून अटक करण्याची मोठी कसोटी पोलिसांची आता असणार आहे.

महसूल अधिकारी लक्ष ठेवून
प्रांतधिकारी डॉ.अजित थोरबोले, प्रशिक्षणार्थी उप जिल्हाधिकारी सुमित शिंदे, तहसीलदार उषाराणी देवगुणे शहरावर लक्ष ठेवून असून मंगळवारी दोन तासांची शिथीलता दिल्यानंतर त्यांनी रावेर शहरातील परीस्थितीची पाहणी केली.

सहा गुन्हे : 17 आरोपींना पोलिस कोठडी
रावेर दंगलप्रकरणी एकूण सहा तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यात पोलिस प्रशासनावर हल्ला, दगडफेक केल्याप्रकरणी तसेच दोन गटातील स्वतंत्र तक्रारी प्रकरणी व एका गटाचा दुसर्‍या गटाविषयी दंगलीचा गुन्हा, शेख वाजीद यांना यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केल्याप्रकरणी गुन्हा, यशवंत मराठी यांच्या खुनप्रकरणी गुन्हा तसेच होमगार्ड निलेश जगताप यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 17 जणांना अटक करण्यात आली असून मंगळवारी न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

शासकीय कर्मचार्‍यांना आमदारांनी वाटले मास्क
जगभरात जीवघेणा कोरोना व्हायरस आपला प्रादुर्भाव वाढवित असतांना येथील शासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या सुरक्षतेसाठी आमदार शिरीष चौधरी यांनी प्रांताधिकारी अजित थोरबोले, सुमित शिंदे, तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्यासह इतर कर्मचार्‍यांना मास्कचे वाटप केले आहे.