ठाणे । काही दिवसांपूर्वी मनसे कार्यकर्त्यांनी ठाणे स्टेशनसह परिसरातील अनाधिकृत फेरीवाला हटाव मोहीम हाती घेतली होती. त्या आंदोलनादरम्यान फेरीवाल्यांविरोधात खळ्ळखट्याक आंदोलन करण्यात आले होते. फेरीवाल्यांविरोधात खळ्ळखट्याक करणे मनसे कार्यकर्त्यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. याप्रकरणी विशेष कार्यकारी दंडाधिकार्यांनी मनसे नेत्यांना नोटीस बजावली आहे. 21 ऑक्टोबर रोजी मनसे ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव, कार्यकर्ते महेश कदम, आशिष डोके, रवी सोनार, रवी मोरे, विश्वजित जाधव आणि सुशांत सूर्यराव यांनी ठाणे स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांना मारहाण करून तोडफोड केली होती. याप्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाणे आणि नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.
कार्यकर्त्यांच्या मागचा पोलिसी ससेमिरा सुरूच
पोलिसांनी अटक करून न्यायालयात नेल्यानंतर सर्वाची जामिनावर सुटका झाली असली, मनसे कार्यकर्त्यांच्या मागचा पोलिसी ससेमिरा सुरूच आहे. नौपाडा विभागाचे विशेष कार्यकारी दंडाधिकारी अभय सायगावकर यांनी 3 नोव्हेंबर रोजी मनसे शहराध्यक्ष अविनाश जाधव आणि कार्यकर्त्यांना वर्तणूक सुधारली नसल्याबाबत नोटीस बजावल्या आहेत. यात अविनाश जाधव यांना 3 वर्षाकरीता 1 कोटी रुपयांचा तर इतर कार्यकर्ते यांना 25 लाखांचा जात मुचलका का घेण्यात येऊ नये ? असे नमूद करत 7 दिवसात नोटीसचे उत्तर द्यावे, असे बजावले आहे. दंडाधिकार्यांच्या या नोटीसमुळे मनसेमध्ये संताप व्यक्त होत आहे. लोकशाहीमध्ये आंदोलन चिरडण्याचा प्रकार असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.