जळगाव। वसूली कमी केल्याने प्रभाग अधिकारी, कर्मचार्यांनी कामचुकारपणा केल्याचे दिसून आल्यांने अशा कर्मचार्यांना 500 ते 2000 रूपयांचा दंड तसेच एक वेतन वाढ व दोन वेतनवाढ कायम बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. यात प्रभाग समिती क्र. 3चे कर अधिक्षक चंद्रकांत पधारे यांना 2000 रूपयांचा दंड करण्यात आला आहे. हा दंड रद्द करण्याची मागणी आयुक्तांकडे त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. चंद्रकांत पंधारे हे सन 2016-17 या आर्थिक वर्षांत प्रभाग समिती क्र. 3चे कर अधिक्षक म्हणून काम पहात असतांना त्यांच्याकडे सहा. ग्रंथपाल पदाचे काम सांभाळत आहेत.
दंड अन्यायकारक असल्याचा दावा
पंधारे हे ग्रंथालय विभागात सकाळी 8 ते 11 वेळेत तर सकाळी 11 ते सायंकाळ 6 वाजेपर्यंत प्रभाग समिती क्र. 3चे काम पहात असतात. प्रभारी कर अधिक्षक पदासोबतच जमाबंदी लिपीक, वरिष्ठ लिपीक या पदांचेही काम पहात आहेत. पंधारे यांना कामाचा व्याप पहाता प्रभाग समिती क्र.3मध्ये केलेली वसूली ही समाधानकारक असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या सर्व कामांची दखल न घेता 80 टक्के पेक्षा कमी वसुली झाल्याचे कारण देऊन करण्यात आलेला 2 हजार रूपयांचा दंड अन्यायकारक असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, पंधारे हे मागासवर्गीय कर्मचारी असल्यानेच हेतुपुरस्सर त्यांना त्रास दिला जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यांना करण्यात आलेला दंड रद्द करावा अशी विनंती पंधारे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे. दंड रद्द न केल्यास अॅस्ट्रॉसिटी केस दाखल करण्यासाठी न्यायालयाकडे दाद मागण्याची परवानगी आयुक्तांकडे पंधारे यांनी मांगितली आहे. कामाचा जास्त बोजा असल्यानेच वसूली कमी झाल्याचेही त्यांनी निवेदनात म्हटले.