दंत महाविद्यालयासाठी जागेची पाहणी

0

जळगाव। येथील जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याच्या प्रक्रियेनंतर दंत महाविद्यालयासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या चार सदस्यीस समितीने बुधवारी जळगावात येऊन पाहणी केली. या महाविद्यालयात पहिल्या वर्षी 50 जागांसाठी प्रवेश दिले जाणार आहेत. दंत महाविद्यालय सुरू करण्यासाठी चिंचोली शिवारात जागेची तसेच जिल्हा रुग्णालयाची पाहणी या समितीने केली. या पाहणीचा अहवाल महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे सादर केला जाणार आहे.

शल्यचिकित्सकांशी चर्चा
जळगावात शासकिय वैद्यकीय शिक्षण संकुल सुरु करण्यासाठी वैद्यकिय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी प्रयत्न केले . दंत महाविद्यालय सुरू करण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने चार जणांची समिती नेमली आहे. या समितीचे अध्यक्ष डॉ.हेमंत उमर्जी (मुंबई), सदस्य डॉ. किशोर महाले, डॉ.राजन मुंदडा व डॉ. राजन बिंदू (औरंगाबाद) हे जळगावात आले होते. त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुनील भामरे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किरण पाटील यांची भेट घेऊन महाविद्यालय सुरू करण्याबाबत चर्चा केली.

चिंचोली शिवारात पाहणी
या समितीने चिंचोली शिवारात जागेची पाहणी केली. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.किरण पाटील व जी.एम.फाउंडेशनचे अरविंद देशमुख यांनी त्यांना माहिती दिली. जळगावात योग्य स्थिती आहे का? सुविधा उपलब्ध होऊ शकतात का ? दंत महाविद्यालयाची आवश्यकता आहे का? याबाबत कागदपत्रांची पडताळणी केली. या पाहणीचा अहवाल राज्य शासन व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला सादर केला जाणार आहे. त्यानंतर डेंटल कौन्सिल ऑफ इंडिया (दिल्ली) यांची समिती जळगावात जागा व सुविधांची पाहणी करणार आहे.